
सोलापूर, 12 जानेवारी (हिं.स.)। पती सतत मारहाण करतो, सासरच्यांकडून हुंड्यासाठी छळ होतोय, गावात हातभट्टीची विक्री होते, जमिनीची मोजणी, वाटणी होऊनही शेजारच्यांकडून त्रास दिला जातो, गावातील सावकार त्रास देत आहे, अशा सामान्यांच्या तक्रारी असतात. स्थानिक पोलिसांत तक्रार करूनही अपेक्षित न्याय मिळत नाही. अशा सामान्यांना आता प्रत्येक शनिवारी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी स्वत: भेटणार आहेत. सर्वसामान्यांच्या तक्रारी ऐकून त्यांना न्याय देण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी जनता दरबार सुरू केला आहे.सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात २५ पोलिस ठाणी आहेत. पोलिस ठाण्यांमध्ये दररोज शेकडो तक्रारी दाखल होतात. पण, पोलिस ठाण्यात धाव घेऊनही प्रत्येकाला अपेक्षित न्याय मिळतोच असे नाही. त्यामुळे त्या सामान्य व्यक्तीस, महिलेस पोलिस अधीक्षकांना भेटण्याची इच्छा असते. मोठ्या साहेबांना भेटल्यावर आपल्याला नक्की न्याय मिळेल, अशी त्यांना आशा असते. सामान्यांची ही गरज ओळखून पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जनता दरबार सुरू केला आहे.यावेळी संबंधित पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, भरोसा सेलचे अधिकारी, अंमलदार, समुपदेशक असतात. यावेळी कौटुंबिक छळणारे, अवैध हातभट्टी विक्रेते, खासगी सावकारांकडून चांगल्या वर्तनाचे बंधपत्र लिहून घेतले जाते. तक्रारदारांना सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या संकेतस्थळावर थेट तक्रार करता येते. याशिवाय आता नव्याने सुरू केलेल्या ‘न्याय संवाद ॲप’च्या ८६९८० ४०५४२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर देखील सामान्य नागरिक तक्रार करू शकतात, असे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड