
रायगड, 12 जानेवारी (हिं.स.)। प्रतिस्पर्धा, अडचणी आणि सामाजिक बंधनांवर मात करत जिद्द, चिकाटी आणि शिक्षणाच्या जोरावर यश संपादन करता येते, याचे जिवंत उदाहरण अंगणवाडी सेविका जिविता पाटील यांनी समाजासमोर ठेवले आहे. एलएलएम (मास्टर ऑफ लॉ) पदव्युत्तर परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातून कायद्याची पदव्युत्तर पदवी मिळवणारी पहिली अंगणवाडी सेविका ठरण्याचा बहुमान मिळविला आहे.
वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, एक वर्षाच्या मुलासह आलेल्या विधवापणाच्या कठीण वास्तवाशी सामना करत त्यांनी खचून न जाता शिक्षणाचा मार्ग निवडला. घरगुती जबाबदाऱ्या, आर्थिक अडचणी आणि सामाजिक अडथळे असूनही त्यांनी शिक्षण थांबवले नाही. भाजी विक्रीपासून ते पतसंस्थांतील कामांपर्यंत मिळेल ते काम करत त्यांनी शिक्षण आणि संसाराची सांगड घातली. सासू मनोरमा पाटील यांच्या पाठिंब्यामुळे हा प्रवास अधिक भक्कम झाला.
एम.ए., बी.एड., एम.ए. एज्युकेशन, एम.एस.डब्ल्यू. आणि आता एलएलएम अशा विविध पदव्या प्रथम श्रेणीत संपादन करत त्यांनी २०११ पासून एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका म्हणून प्रामाणिक सेवा दिली. सेवाकाळात महिला बचतगट उभारणी, मार्गदर्शन आणि सामाजिक उपक्रमांद्वारे अनेक महिलांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवला.
अलिबाग जिल्हा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात कार्यरत असताना त्यांनी वंचित, एकल महिला आणि दुर्बल घटकांना कायदेशीर हक्कांची जाणीव करून देत शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून दिला. ‘तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतिक फाउंडेशन’च्या माध्यमातून ४८ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी समाजातील मुलींच्या भविष्यासाठी भक्कम पाऊल उचलले आहे.
कोरोना काळातील सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना दिल्ली येथे भारत भूषण पुरस्कार २०२२ ने सन्मानित करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ती, व्याख्याता, परीक्षक, पत्रकार अशा विविध भूमिका सांभाळत असतानाही त्या अभिमानाने अंगणवाडी सेविका असल्याचे सांगतात, हेच त्यांच्या सक्षमीकरणाचे खरे प्रतीक आहे. जिविता पाटील यांचा प्रवास केवळ वैयक्तिक यशाचा नाही, तर शिक्षणाच्या माध्यमातून महिलांना सक्षम बनविणाऱ्या परिवर्तनाची प्रेरणादायी कहाणी ठरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके