
नागपूर, 12 जानेवारी (हिं.स.) : “स्वामी विवेकानंद हे केवळ महान संन्यासी नव्हते, तर ते एक उत्कृष्ट व्यवस्थापकही होते. त्यांची संघटनात्मक दृष्टी आणि नेतृत्व कौशल्य आजच्या काळातही तितकेच उपयुक्त आणि प्रेरणादायी आहे. व्यवस्थापन शाखेतील विद्यार्थ्यांनी रामकृष्ण मिशनच्या जागतिक विस्ताराचा अभ्यास करावा,” असे आवाहन भारतीय चिन्मय युवा केंद्राचे राष्ट्रीय सल्लागार स्वामी मित्रानंद यांनी भारतीय प्रबंध संस्था (आयआयएम) नागपूरच्या विद्यार्थ्यांना केले.
राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. स्वामी मित्रानंद म्हणाले की, ब्रिटिश राजवट आणि जागतिक युद्धांसारख्या कठीण काळातही स्वामी विवेकानंदांनी उभी केलेली स्वयंसेवी संस्था आज 150 वर्षांनंतरही जगभर शेकडो देशांमध्ये प्रभावीपणे कार्यरत आहे. ही आजच्या व्यवस्थापन अभ्यासकांसाठी एक आदर्श केस स्टडी आहे.चिन्मय युवा केंद्र (सीएचवायके) आणि चिन्मय मिशनच्या वतीने सोमवारी आयोजित ‘चिन्मय अमृत यात्रा’ आयआयएम नागपूरच्या परिसरात दाखल झाली. यावेळी अखिल भारतीय चिन्मय युवा केंद्राचे राष्ट्रीय संयोजक स्वामी अनुकूलानंद हेही उपस्थित होते.
पुणे येथून 31 डिसेंबर रोजी सुरू झालेल्या या यात्रेचा उद्देश पुढील 300 दिवसांत श्रीमद्भगवद्गीतेच्या संदेशाच्या माध्यमातून देशभरातील 10 लाख युवकांना प्रेरित करणे हा आहे. समर्पित युवावीर यात्रिकांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा रविवारी नागपूरमध्ये दाखल झाली असून, सोमवारी तिचा प्रमुख मुक्काम आयआयएम नागपूर येथे होता. आजच्या युवकांसाठी भगवद्गीतेचे महत्त्व विशद करताना स्वामी मित्रानंद म्हणाले की, गीता हा अर्जुन आणि श्रीकृष्ण या दोन कर्मशील व्यक्तींमधील संवाद आहे आणि ती विशेषतः युवकांसाठी आहे. युवावस्थाच गीता समजून घेण्याचा योग्य काळ आहे. गीता मनावर नियंत्रण ठेवण्याचे शिक्षण देते. स्थिर आणि संयमित मन कोणत्याही समस्येचे समाधान शोधू शकते, तर विचलित मन सामान्य परिस्थितीलाही समस्या बनवते.
आयआयएम नागपूरच्या परिसराचे आणि विचारसरणीचे कौतुक करताना त्यांनी सांगितले की, ही संस्था भारतीय ज्ञानपरंपरेचे दर्शन घडवते. “परंपरा आणि तंत्रज्ञान यांचा समन्वय साधणे ही काळाची गरज आहे,” असे नमूद करत त्यांनी विद्यार्थ्यांना गीतेला जीवनदर्शन म्हणून स्वीकारण्याचे आणि तिचे संवाहक होण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते. सत्रानंतर प्रश्नोत्तराचा संवादात्मक कार्यक्रमही पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भिमराया मेत्री यांनी स्वामी मित्रानंद आणि चिन्मय युवा केंद्राच्या पथकाचे स्वागत केले.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी