रत्नागिरी : ग्रंथप्रदर्शनाने स्वामी विवेकानंद जयंती साजरी
रत्नागिरी, 12 जानेवारी, (हिं. स.) : स्वामी विवेकानंद जयंती दिनानिमित्ताने स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रावर आधारित तसेच युवकांना करिअरविषयक मार्गदर्शन करणाऱ्या ग्रंथांचे प्रदर्शन गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात भारतर
ग्रंथप्रदर्शनाने स्वामी विवेकानंद जयंती साजरी


रत्नागिरी, 12 जानेवारी, (हिं. स.) : स्वामी विवेकानंद जयंती दिनानिमित्ताने स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रावर आधारित तसेच युवकांना करिअरविषयक मार्गदर्शन करणाऱ्या ग्रंथांचे प्रदर्शन गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम वाचन कट्टा येथे आयोजित करण्यात आले.

या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या आणि रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी केले. याप्रसंगी हिंदी विभागप्रमुख डॉ. एस. डी. मधाळे, संगणकशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. अनुजा घारपुरे, मराठी विभागाच्या डॉ. निधी पटवर्धन, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. सचिन सनगरे, प्रा. कृष्णात खांडेकर, प्रा. डी. एस. कांबळे, ग्रंथपाल किरण धांडोरे, कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी आणि ग्रंथालय कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. अपर्णा कुलकर्णी मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, अमेरिकेत झालेल्या सर्वधर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणारे स्वामी विवेकानंद हे भारतमातेचे एक महान सुपुत्र होते. जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे. त्यांनी फारच सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली. आपल्या अल्पशा व्याख्यानात जणू त्यांनी विश्वधर्म परिषदेचे प्राणतत्त्वच विशद केले. काही दिवसांतच आपल्या विचारांनी त्यांनी अमेरिकेतील प्रमुख वृत्तपत्रांचे लक्ष वेधून घेतले. अशा या महान व्यक्तीच्या जीवनकार्यातून आपण सर्वांनी प्रेरणा घेऊन जीवनाचे ध्येय निश्चित केले पाहिजे. त्यांचे विचार आपल्यासमोर ग्रंथ रूपाने आणण्याचे कार्य या ग्रंथ प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रंथालयाने केले आहे; सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असे सांगून सर्वांना युवा दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचक गटाचा विद्यार्थी ओमकार आठवले याने तर आभारप्रदर्शन वाचक गटाची विद्यार्थिनी कु. सेजल मेस्त्री हिने केले. ग्रंथप्रदर्शन उद्यापर्यंत (दि. १३ जानेवारी) प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यासाठी खुले राहणार आहे.

दरम्यान, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) कै. बाबूराव जोशी ग्रंथालयात 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा २०२६' या उपक्रमांतर्गत गेल्या १ जानेवारीपासून वाचन पंधरवडा' विविध वाचन प्रेरणाविषयक कार्यक्रम आयोजित केला आहे. तो १५ जानेवारीपर्यंत चालणार आहे. या पंधरा दिवसांमध्ये वाचनविषयक उपक्रमांतर्गत निबंधस्पर्धा, ग्रंथ अभिवाचन, साहित्य संवाद, लेखक आपल्या भेटीला, ग्रंथप्रदर्शन, ग्रंथ दिंडी, सामूहिक ग्रंथवाचन, राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांकडून अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना गोष्टी आणि बोधकथा वाचन-कथन उपक्रम, पथनाट्य असे वाचन चळवळीला पुढे नेणारे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande