
नांदेड, 12 जानेवारी (हिं.स.)। “संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी या संस्थेला भेट दिल्यानंतर येथील बहुआयामी उपक्रम पाहून आम्ही नवी प्रेरणा आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन जात आहोत,” अशी भावना ‘देखणी ती पाऊले’ या नेटवर्कच्या प्रत्येक सदस्याने निरोप घेताना व्यक्त केली. संस्कृती संवर्धन मंडळाच्या संकुलात ‘देखणी ती पाऊले’ परिवाराचे चौथे अर्धवार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. शनिवारी उद्यमिता इमारतीतील कॉन्फरन्स हॉलमध्ये या संमेलनाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
यावेळी ‘देखणी ती पाऊले’ नेटवर्कचे निर्माते तथा सुविध्य प्रसारक मंडळ, बोरिवलीचे अध्यक्ष महादेवराव रानडे, देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ (जि. रत्नागिरी) चे अध्यक्ष सदानंद भागवत, स्व. वैभव फळणीकर मेमोरियल फाउंडेशन – आपलं घर, पुणेचे अध्यक्ष विजय फळणीकर, संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळीचे चेअरमन प्रमोदजी देशमुख, विश्वस्त संजीव सगरोळीकर व सुनील देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या सदस्यांनी या अर्धवार्षिक स्नेहसंमेलनात सहभाग घेत आपापल्या संस्थांचे कार्य, अनुभव तसेच सामाजिक उपक्रमांबाबत आपले मनोगत व्यक्त केले.तत्पूर्वी या टीमने श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल येथील अटल टिंकरिंग लॅब, संगणक प्रयोगशाळा, नृत्य विभाग, कलादालन, कृषी विज्ञान केंद्र तसेच मल्लखांब प्रात्यक्षिके पाहिली. रात्री दुर्बिणीच्या सहाय्याने आकाशदर्शन करत तारे व खगोलविषयक माहितीचा अनुभव घेतला. सदस्यांनी जलतरण तलाव, अश्वशाळा, पंडित टॅंक, भूगोल पार्क, सायन्स पार्क तसेच आनंदी गोपाळ परिसर येथे भेट देत सर्व उपक्रमांची सखोल पाहणी केली.
या भेटीनंतर झालेल्या छोटेखानी समारंभात सर्व सदस्यांनी संस्कृती संवर्धन मंडळाच्या शैक्षणिक, सामाजिक व नवोपक्रमात्मक कार्याचे मनापासून कौतुक केले. “आम्ही आमच्या-आमच्या कार्यक्षेत्रात येथून प्रेरणा व ऊर्जा घेऊन जात आहोत,” असे भावनिक मनोगत व्यक्त करत सदस्यांनी संमेलनाचा समारोप केला.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis