
अमरावती, 12 जानेवारी (हिं.स.)।
राष्ट्रीय महामार्गावरील तिवसा शहरातील सॉफ्ट कॉर्नर परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास अचानक घडलेल्या एका थरारक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. कलकत्त्यावरून निघालेला व नागपूर मार्गे अमरावतीकडे जाणारा एक अवजड १४ टायर ट्रक तिवसा शहरात प्रवेश करताच सुरुवातीलाच सॉफ्ट कॉर्नर परिसरात त्याच्या टायरचा जोरदार स्फोट झाला आणि क्षणार्धात ट्रकने भीषण आग घेतली.
सदर ट्रक (क्रमांक एन.एल. ०१ ए. डी. २६६१) हा कलकत्त्यावरून प्लास्टिक बारीक दाणा असे रॉ मटेरियल घेऊन (नापी) सुरतच्या दिशेने जात होता. सॉफ्ट कॉर्नरजवळ अचानक टायर फुटताच आगीचे लोट उठू लागले. आगीच्या तीव्रतेमुळे महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांमध्ये घबराट निर्माण झाली. अनेक वाहनचालकांनी आपली वाहने रस्त्याच्या कडेला थांबवून सुरक्षित अंतर राखले, तर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच तिवसा नगरपंचायतीचे अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नांनंतर ३ तासानंतर अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. याचवेळी तिवसा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारीही घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करत परिस्थिती नियंत्रणात आणली.सुदैवाने या भीषण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेनंतर काही काळ तिवसा शहरात भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, टायर फुटण्यामागील नेमके कारण काय, याचा तपास सुरू असून पुढील तपास सुरू आहे. प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी