दैनंदिन जीवनात संस्कृतचा पदोपदी वापर करा - डॉ. कार्तिक राव
रत्नागिरी, 12 जानेवारी, (हिं. स.) | मी स्वतः वैद्यकीय क्षेत्रातील आहे, मात्र माझ्या मनात संस्कृतविषयी अवीट गोडी आहे. संस्कृतच्या प्रचारासाठी सर्वांनी दैनंदिन जीवनात संस्कृतचा पदोपदी वापर केला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. कार्तिक राव यांनी केले. संस्क
डॉ. कार्तिक राव यांचा सत्कार करताना डॉ. दिनकर मराठे.


रत्नागिरी, 12 जानेवारी, (हिं. स.) | मी स्वतः वैद्यकीय क्षेत्रातील आहे, मात्र माझ्या मनात संस्कृतविषयी अवीट गोडी आहे. संस्कृतच्या प्रचारासाठी सर्वांनी दैनंदिन जीवनात संस्कृतचा पदोपदी वापर केला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. कार्तिक राव यांनी केले.

संस्कृत माध्यमातून संस्कृत शिक्षण या कार्यशाळेत त्यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी त्यांचा सन्मान केला. भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, भारतीय भाषा समिती शिक्षा मंत्रालय (नवी दिल्ली) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि गोगटे- जोगळेकर महाविद्यालय, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग, संस्कृत शिक्षक मंडळाच्या सहयोगाने ही कार्यशाळा झाली.

डॉ. राव पुढे म्हणाले की, मी माझ्या दैनंदिन जीवनात, कौटुंबिक कार्यक्रमांची निमंत्रणे संस्कृतमध्ये देतो. माझ्या गुरूंसोबत केवळ संस्कृत भाषेत संवाद साधतो. रुग्णचिकित्सा करून काही वेळ मी संस्कृत व्याकरणाबाबत मार्गदर्शन करतो. सुधर्मा हे संस्कृत दैनंदिन वार्तापत्र तसेच संभाषण संदेश हे मासिक मी वाचतो. इतकेच नाही तर माझ्या प्रिस्क्रिप्शनवरदेखील मी थोडक्यात का होईना, पण संस्कृत भाषेतील एक वाक्य छापलेले आहे. आपल्याला संस्कृत भाषेविषयी अभिमान अनुभवता आला पाहिजे. वेळात वेळ काढून संस्कृत भाषेचे श्रवण केले पाहिजे.

वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येकाने दैनंदिन जीवनात संस्कृत भाषेचा वापर केल्यास संस्कृतचे महत्त्व सर्वदूर पोहोचेल. शिक्षकांनी आपल्या अध्यापनात यासारख्या उदाहरणांचा चपखल वापर करावा. विद्यार्थ्यांच्या मनात संस्कृत विषय म्हणून नाही तर भाषा म्हणून महत्त्व रुजवावे. तेव्हाच जाऊन खऱ्या अर्थाने संस्कृतसाठीचे प्रयत्न सुसंघटित होऊ शकतात, असे ते म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande