
रायगड, 12 जानेवारी (हिं.स.)। ॲड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन ‘विधीतरंग २०२५’चा उद्घाटन समारंभ नुकताच महाविद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
कायदेशीर शिक्षणाबरोबरच समाजात वावरताना आवश्यक असलेला आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि प्रभावी वक्तृत्व विकसित होण्यासाठी स्नेहसंमेलनासारखे मंच आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून अलिबाग नगरपालिकेच्या नवनियुक्त नगरसेवकांचा जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील, उपाध्यक्षा डॉ. साक्षी गौतम पाटील तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य ॲड. नीलम किशोर हजारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
‘विधीतरंग २०२५’ अंतर्गत विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व कलात्मक क्षमतेला वाव देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लॅटिन मॅक्झिम, लिगल क्विझ, इनडोअर गेम्स, मर्डर मिस्ट्री, ट्रेझर हंट आदी स्पर्धांचा समावेश होता. ‘ट्रेडिशनल डे’च्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी संगीत, नृत्य, नाट्य व स्टँडअप कॉमेडी अशा विविध कला प्रकारांतून आपले सादरीकरण केले. स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा डॉ. साक्षी गौतम पाटील यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या स्नेहसंमेलनास महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके