
सोलापूर, 12 जानेवारी (हिं.स.)। महापालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी आता अवघे दोन दिवस राहिले आहेत. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. बहुतेक मतदार घरी सापडतील म्हणून भाजप, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही शिवसेनेसह माकप, वंचित बहुजन विकास आघाडी, एमआयएम, समाजवादी पक्षाच्या उमेदवारांनी ‘होम टू होम’ प्रचारावर भर दिला होता. याशिवाय या उमेदवारांच्या रिक्षातूनही गल्लीगल्लीत प्रचार सुरु होता. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, समाजवादीचे रियाज खरादी, काँग्रेसचे चेतन नरोटे यांच्यासह बहुतेक उमेदवारांनी प्रभागात पदयात्रा काढून शक्तीप्रदर्शन देखील केले.महापालिकेच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर असल्याने आमदारांना तथा पक्षातील बड्या नेत्यांना उमेदवारांची नावे सांगावी लागत नाहीत. कमळ हेच आपला उमेदवार असल्याचा प्रचार लोकप्रतिनिधी सर्व प्रभागांमध्ये करीत आहेत. दुसरीकडे शिवसेना व राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर पहिल्यांदाच महापालिका निवडणूक होत असल्याने युतीतील उमेदवारांना घड्याळ व धनुष्यबाण ही चिन्हे आमची असल्याचे सांगावे लागत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड