
मुंबई, 12 जानेवारी (हिं.स.) - राज्यात गेल्या काही वर्षांत राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. त्यातून शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस या दोन पक्षांत दोन गट पडले. त्यामुळे ठाकरे-शिंदे, पवार काका आणि पुतणे यांच्याच अभूतपूर्व दरी निर्माण झाली. मात्र दरम्यान महापालिका निवडणुकीच्या काळात पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काॅंग्रेस पुन्हा एकत्र येत निवडणुका लढवत आहेत. यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात आले. या चर्चांवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मी विचार केला की मतांची विभागणी न होऊन देण्यासाठी हीच मते जर एकत्र आली तर आपली आणखी संख्या वाढेल. शेवटी संख्या वाढण्याला महत्व असतं, असं कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यामागचं अजित पवार यांनी सांगितलं. ते एका माध्यम मुलाखतीत बोलत होते.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काॅंग्रेस एकत्र निवडणूक लढवत आहेत. मात्र, या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काॅंग्रेस एकत्र नेमकं कशा आल्या? यामागचं कारण काय आहे? भाजपामुळे दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात एकत्र आल्या का? या प्रश्नांवर अजित पवारांनी भाष्य केलं.
पुण्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी विचारलं होतं की, भाजपा पुण्यात स्वबळावर निवडणूक लढवत आहे, मग तुम्ही (शिवसेना शिंदे गट) आणि आम्ही (राष्ट्रवादी अजित पवार गट) एकत्र यायचं का? तर त्यांनी मला सांगितलं की नाही. माझी भाजपाबरोबर चर्चा सुरू आहे. त्यानंतर शेवटी एबी फॉर्म देण्याच्या एक दिवस आधी मला शिंदेंचा फोन आला आणि सांगितलं की आमचं आणि त्यांचं (भाजपा) जमत नाही, आपण एकत्र निवडणूक लढवायची का? तेव्हा मी सांगितलं की, मी आधी तुम्हाला म्हणत होतो की, आपण एकत्र निवडणूक लढवायची का? पण आता मी उमेदवार जाहीर केलेत. त्यानंतर आता आपण एकत्र आलो तर बंडखोरी होईल आणि निवडणुकीत पक्षाला फटका बसेल. त्यानंतरही उदय सामंत यांनी त्यांचे काही पदाधिकारी माझ्याकडे पाठवले. मग शेवटी आम्ही पिंपरी-चिंचवडमध्ये दोन प्रभागात त्यांचे दोन आणि आमचे दोन उमेदवार असं केलं. मात्र, पुण्यासाठी ते शक्य झालं नाही. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाशी आमचं जमलं. त्यामुळे आम्ही एकत्र निवडणूक लढवण्याचं ठरवलं. मी विचार केला की आम्ही आधी एकत्र असताना पालिकेची निवडणूक लढवली होती, पण त्यानंतर बरंच पाणी वाहून गेलं. मात्र, मतांची विभागणी न होऊन देण्यासाठी हीच मते जर एकत्र आली तर अजून आपली संख्या वाढेल. कारण शेवटी संख्या वाढण्याला महत्व असतं. बाकी चर्चांना काही महत्व नसतं. त्यानंतर आम्ही पहिल्यांदा चर्चा केली, त्यात काही तोडगा निघाला नाही. मग बातम्या आल्या. बातम्या आल्या की सगळ्या जागा घड्याळावर लढा, पण मी असं म्हटलंच नव्हतं.
दरम्यान त्यानंतर मग मी बोललो की मी असं कशाला म्हणेन. त्यानंतर खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार आणि मी आम्ही मिळून चर्चा केली. मग त्यांच्या लक्षात आलं की, दादांचं असं काही म्हणणं नाही. उलट मी त्यांना असं म्हणालो की, ज्या ठिकाणी तीन तुतारी आणि एक घड्याळ असेल तिथे चारही तुतारी घ्या. तसं म्हटल्यानंतर मग आमची (दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची) युती झाल्याचे अजित पवारांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी