
छत्रपती संभाजीनगर, 12 जानेवारी (हिं.स.)। आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर करत शहरातील सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल आणि रिसर्च फाऊंडेशन येथे १०० हून अधिक रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या. ही महत्त्वाची वैद्यकीय कामगिरी असून रुग्णांसाठी वेदनामुक्त व जलद बरे होण्याचा नवा मार्ग खुला झाला आहे, अशी माहिती देण्यात आली.
रोबोटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यात येणाऱ्या गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमुळे अचूकता अधिक वाढते, रक्तस्राव कमी होतो तसेच शस्त्रक्रियेनंतर रुग्ण लवकर चालू-फिरू लागतो.
पारंपरिक शस्त्रक्रियेच्या तुलनेत या पद्धतीत गुंतागुंत कमी असून, दीर्घकालीन परिणाम अधिक चांगले दिसून येतात. रोबोटिक गुडघा प्रत्यारोपणामुळे प्रत्येक रुग्णाच्या
शरीररचनेनुसार अचूक नियोजन करता येते. त्यामुळे शस्त्रक्रियेचे यशाचे प्रमाण वाढले असून रुग्णांचे जीवनमान सुधारण्यास मोठी मदत होत आहे, असे रुग्णालयातील अस्थिरोग विभागाचे प्रमुख रोबोटिक सर्जन डॉ. उदय फुटे यांनी सांगितले. आयएमएचे शहर अध्यक्ष डॉ. अनुपम टाकळकर, सचिव डॉ. योगेश लक्कस यांनी रुग्णालयातील संपूर्ण वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले व भविष्यातही अत्याधुनिक व दर्जेदार उपचार रुग्णांपर्यंत पोहोचवण्याची अपेक्षा व्यक्त केली.
या प्रसंगी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. अमोल कुलकर्णी, प्रशासक डॉ. प्रसाद पुंडे, डॉ. गजानन देशमुख, डॉ. दीपक भांगे, मार्केटिंग हेड राजीव बाळ उपस्थित होते. रुग्णालयाच्या यशस्वी टप्प्याबद्दल रुग्णालयाचे विश्वस्त राजकुमार धूत, अक्षय धूत, सुशीलकुमार मंत्री यांनी डॉक्टरांसह सर्व टीमचे कौतुक केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis