
पुणे, 12 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती शिवाजीनगर-मॉडेल कॉलनी या प्रभाग क्रमांक १२ चा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर सक्षम, अभ्यासू आणि संवेदनशील नेतृत्वाची आवश्यकता आहे. डॉ. निवेदिता एकबोटे यांच्या रूपाने प्रभागाला एक उच्चशिक्षित आणि विकासाची ठोस दृष्टी असलेला चेहरा लाभला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार व नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.प्रभाग १२ मधील भाजप-आरपीआय (आठवले गट) महायुतीच्या उमेदवार प्राचार्या डॉ. निवेदिता एकबोटे यांच्या प्रचारासाठी रविवारी वडारवाडी परिसरात भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मंजाळकर चौक, अमर मित्रमंडळ, पी.एम.सी. कॉलनी, पांडवनगर आणि हनुमाननगर या भागांत मोहोळ यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. या पदयात्रेला सर्वत्र मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.प्रभागातील समस्यांबाबत बोलताना डॉ. एकबोटे म्हणाल्या, की पोलीस वसाहती आणि महापालिका वसाहतींमधील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता आणि सुरक्षितता या मूलभूत प्रश्नांकडे विशेष लक्ष दिले जाईल. केवळ समस्या मांडण्यापुरते मर्यादित न राहता, त्या सोडविण्यासाठी ठोस आराखडा तयार करून त्याचा पाठपुरावा केला जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु