शिक्षक मतदारसंघात 33 हजार मतदार; अंतिम यादी जाहीर
अमरावती, 13 जानेवारी (हिं.स.)। विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची अंतिम मतदार यादी सोमवार, १२ जानेवारी रोजी घोषित करण्यात आली आहे. या यादीनुसार मतदारसंघात एकूण ३३ हजार नऊ मतदार आहेत. मात्र, अद्यापही नवी मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू असून, संबंधित म
शिक्षक मतदारसंघात 33 हजार मतदार:अंतिम यादी जाहीर, तरीही मतदार नोंदणी सुरूच


अमरावती, 13 जानेवारी (हिं.स.)।

विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची अंतिम मतदार यादी सोमवार, १२ जानेवारी रोजी घोषित करण्यात आली आहे. या यादीनुसार मतदारसंघात एकूण ३३ हजार नऊ मतदार आहेत. मात्र, अद्यापही नवी मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू असून, संबंधित मतदारांची नावे पुरवणी यादीत समाविष्ट केली जातील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी दिली.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार डॉ. सिंघल यांनी सोमवारी सायंकाळी माध्यमांशी संवाद साधला. १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकानुसार ही मतदार यादी तयार करण्यात आली आहे. मागील वेळी झालेल्या बोगस मतदार नोंदणीची दखल घेऊन यावेळी सुरुवातीपासूनच बारकाईने लक्ष देण्यात आले.

यासाठी विभागातील पाचही सहायक निवडणूक अधिकाऱ्यांना (जिल्हाधिकाऱ्यांना) विशेष सूचना देण्यात आल्या होत्या. प्राप्त अर्जांची बारकाईने पडताळणी करूनच पात्र शिक्षकांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. या निवडणुकीसाठी दरवेळी नव्याने मतदार यादी तयार केली जाते.

गेल्या वर्षी ३० सप्टेंबरपासून मतदार नोंदणी सुरू करण्यात आली होती. या नोंदणीसोबतच दावे आणि हरकतीही स्वीकारण्यात आल्या. ६ नोव्हेंबर हा हरकती स्वीकारण्याचा शेवटचा दिवस होता. या कालखंडात प्राप्त झालेले दावे व हरकती विचारात घेऊन प्रत्येक तक्रारीची पडताळणी करण्यात आली.

त्यानंतरच संबंधित नावांना अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले, असे आयुक्त डॉ. सिंघल यांनी स्पष्ट केले. यावेळी अप्पर आयुक्त संजय जाधव, तहसीलदार अनिता झाडे, नायब तहसीलदार श्याम देशमुख, विभागीय माहिती कार्यालयाचे सहायक संचालक विजय राऊत आदी अधिकारी उपस्थित होते.

अंतिम मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेत ३ ते १८ डिसेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात आल्या. तत्पूर्वी, ३० हजार ८६५ नावांचा समावेश असलेली प्रारूप मतदार यादी घोषित करण्यात आली होती. या यादीवर सुमारे ३ हजार ९१७ हरकती व दावे प्राप्त झाले.

या हरकतींच्या आधारे १ हजार ४९ मतदारांची नावे रद्द करण्यात आली. त्यामुळे डिसेंबरअखेर या यादीत २९ हजार ८१६ नावे उरली होती. मात्र, याच काळात ४ हजार ४६ शिक्षकांकडून नवीन अर्ज प्राप्त झाले. या अर्जांची पडताळणी करून त्यातील पात्र नावे प्रारूप यादीत समाविष्ट करण्यात आली, ज्यामुळे अंतिम मतदार यादीतील एकूण नावे ३३ हजार नऊवर पोहोचली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande