
रायगड, 13 जानेवारी (हिं.स.)। श्रीवर्धन नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठीची निवड प्रक्रिया मंगळवारी लोकशाही व पारदर्शक पद्धतीने संपन्न झाली. नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या दालनात दुपारी १२ वाजण्याच्या आत उपनगराध्यक्ष पदासाठी अनंत लक्ष्मण गुरव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेच्या सभागृहात दाखल अर्जांची अधिकृत छाननी करण्यात आली.
छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुपारी १ वाजल्यानंतर नियमानुसार १५ मिनिटांचा कालावधी अर्ज मागे घेण्यासाठी देण्यात आला. मात्र ठरलेल्या वेळेत कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्याने निवडणूक प्रक्रिया पुढे नेण्यात आली. या निवडणुकीत उपनगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवार रिंगणात होते. यामध्ये अनंत लक्ष्मण गुरव आणि सौ. सलोनी स्वरूप मोहित यांचा समावेश होता.
निवडणूक प्रक्रिया नियमानुसार ‘शो ऑफ हॅन्ड्स’ म्हणजेच हात वर करून मतदान पद्धतीने झाली . या मतदानात अनंत लक्ष्मण गुरव यांना एकूण १७ मते प्राप्त झाली, तर सौ. सलोनी स्वरूप मोहित यांना ३ मते मिळाली. बहुमताच्या आधारे अधिक मते मिळालेल्या उमेदवारास विजयी घोषित करण्याच्या नियमानुसार अनंत लक्ष्मण गुरव यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा नगराध्यक्षांच्या वतीने करण्यात आली.
या निवडीमुळे श्रीवर्धन नगर परिषदेत लोकशाही मूल्यांचे पालन करत पारदर्शक पद्धतीने उपनगराध्यक्ष पदाची निवड झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नगर परिषदेत सुरू असलेल्या विविध विकासकामांना नव्या उपनगराध्यक्षांच्या माध्यमातून अधिक गती मिळेल, तसेच नागरिकांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अनंत गुरव यांच्या निवडीबद्दल नगर परिषद सदस्य, कर्मचारी तसेच शहरातील विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके