रायगड - चेंढरे गणात निवडणूक रणशिंग; वेश्वी येथे आ. दळवींची आढावा बैठक
रायगड, 13 जानेवारी, (हिं.स.)। चेंढरे जिल्हा परिषद गणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेली आढावा बैठक सह्याद्री गार्डन, वेश्वी (ता. अलिबाग) येथे उत्साहात पार पडली. शिवसेना (शिंदे गट) चे आमदार श्री. महेंद्र शेठ दळवी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न
चेंढरे गणात निवडणूक रणशिंग; वेश्वी येथे आमदार दळवींची आढावा बैठक


रायगड, 13 जानेवारी, (हिं.स.)। चेंढरे जिल्हा परिषद गणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेली आढावा बैठक सह्याद्री गार्डन, वेश्वी (ता. अलिबाग) येथे उत्साहात पार पडली. शिवसेना (शिंदे गट) चे आमदार श्री. महेंद्र शेठ दळवी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी, उमेदवारी व कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस राजाबाई केणी, मानसी ताई दळवी, अदिती नाईक दळवी, दीपकजी रानवडे यांच्यासह चेंढरे गणातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत जिल्हा परिषद चेंढरे गणासाठी अदिती नाईक दळवी यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. तसेच पंचायत समितीसाठी मृणाली रोहन पाटील यांची उमेदवारी जाहीर करून पक्षाने निवडणुकीची तयारी वेगात सुरू केल्याचे संकेत दिले.

आढावा बैठकीदरम्यान विविध पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकाही जाहीर करण्यात आल्या. अलिबाग–चेंढरे ग्रामपंचायत महिला विभाग प्रमुख म्हणून सौ. प्रणिता ताई प्रल्हाद म्हात्रे यांची निवड करण्यात आली. महिलांचा पक्षसंघटनातील सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने ही नेमणूक महत्त्वाची मानली जात आहे.

यावेळी धरण येथील ग्रामस्थांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केल्याने पक्षबांधणीला अधिक बळ मिळाले. आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना संघटन मजबूत ठेवण्याचे, जनतेशी थेट संपर्क वाढविण्याचे आणि विकासकामांचा आढावा सातत्याने घेण्याचे आवाहन केले.

या बैठकीला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभली असून आगामी काळात चेंढरे गणात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande