
रायगड, 13 जानेवारी (हिं.स.)। पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांसाठी सातत्याने राबविण्यात येणाऱ्या प्रेरणादायी कार्यक्रमांच्या मालिकेत आणखी एक महत्त्वाचा उपक्रम नुकताच पार पडला. सोमवार, दि. १२ जानेवारी २०२६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात असलेल्या शेठ गोशाळा येथे माणगाव तालुक्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी विशेष ‘शेतकरी प्रेरणा भेट’ आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमास तालुक्यातील विविध भागांतील शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.
पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनी आपल्या सीएसआर उपक्रमांच्या माध्यमातून कंपनी परिसरासह माणगाव तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य तसेच कृषी क्षेत्रात अनेक लोकहितकारी योजना राबवत आहे. शाश्वत शेती, पर्यावरण संवर्धन आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे या उद्देशाने सदर प्रेरणा भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
मंडणगड तालुक्यातील अती दुर्गम सुर्ले परिसरात सुमारे साडेचार एकर क्षेत्रात निसर्गरम्य वातावरणात उभारलेली शेठ गोशाळा या प्रेरणा भेटीचे मुख्य आकर्षण ठरली. निसर्गप्रेमी मा. शेठ यांनी अथक परिश्रमातून उभारलेल्या या गोशाळेत कोकणातील कपिला या देशी गायींचे संवर्धन करण्यात आले आहे. सध्या येथे लहान-मोठ्या मिळून सुमारे ६० गोवंशाचे संगोपन केले जात असून त्यावर आधारित विविध उपक्रम राबविले जात आहेत.
गोशाळेतून शेणखत, गोमूत्र, दूध, ताक, तूप यांसह रसायनविरहित धूपकांडी, साबण, सर्वसाधारण औषधे तसेच कच्च्या घाणीपासून तयार होणारे खाद्यतेल आदी आरोग्यदायी उत्पादने तयार केली जातात. या सर्व उत्पादनांची प्रत्यक्ष माहिती व उपयोग गोशाळेतील उर्मिला पवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तरपणे दिली.
या भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी गोशाळेतील दैनंदिन नियोजन, व्यवस्थापन व उत्पादन प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. तसेच स्नेहभोजनाचा आस्वाद घेत आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या प्रेरणा भेटीत माणगाव तालुक्यातील विविध विभागांतील प्रयोगशील शेतकरी, माणगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अशोक मारकड, प्रकाश सरतापे तसेच पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीच्या सीएसआर विभागाच्या आसावरी काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमातून शाश्वत, पर्यावरणपूरक व उत्पन्नवाढीस सहाय्यक शेतीसाठी शेतकऱ्यांना नवी दिशा व प्रेरणा मिळाल्याची भावना सर्व उपस्थितांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके