
रायगड, 13 जानेवारी, (हिं.स.)। राज्यातील महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाहीर प्रचार समाप्त झाल्यानंतर सर्व प्रकारच्या जाहिरातींवर पूर्णतः बंदी राहणार आहे. संबंधित विविध अधिनियमांतील तरतुदीनुसार जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर मुद्रित, इलेक्ट्रॉनिक तसेच समाजमाध्यमांवर कोणत्याही स्वरूपात प्रचारविषयक जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ मधील कलम २७(अ) तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १४(४) अन्वये महापालिका निवडणुकीसाठी मतदान समाप्तीच्या ४८ तास अगोदर प्रचारावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार १५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता मतदानाची वेळ संपत असल्याने १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता जाहीर प्रचाराची अधिकृत समाप्ती होईल. त्यामुळे या वेळेनंतर कोणत्याही माध्यमातून जाहिरातींची प्रसिद्धी अथवा प्रसारण करता येणार नाही, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी यापूर्वीच दिली आहे.
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने प्रत्येक महापालिकेच्या क्षेत्रात माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती (माध्यम कक्ष) स्थापन केली आहे. जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी किमान पाच दिवस आधी अर्ज सादर करणे बंधनकारक होते. प्रचार कालावधी १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता संपत असल्याने, अर्ज मंजुरीची प्रक्रिया पूर्ण व्हावी यासाठी सोमवार, दि. १२ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेपर्यंतच अर्ज स्वीकारण्यात येणार होते. त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
जाहीर प्रचार समाप्तीनंतर मुद्रित माध्यमांच्या जाहिरातींच्या पूर्वप्रमाणनाचा किंवा परवानगीचा प्रश्नच उद्भवत नाही. यासंदर्भातील सविस्तर तरतुदी राज्य निवडणूक आयोगाच्या ९ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या ‘प्रसार माध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रमाणन आदेश, २०२५’ मध्ये नमूद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उमेदवार, राजकीय पक्ष व माध्यमांनी या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके