
छत्रपती संभाजीनगर, 13 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी 'मतदारांना मतदार यादीमधील त्यांचे नाव आणि मतदान केंद्र सहज कळावे यासाठी महापालिकेने 'स्मार्ट सिटी' च्या मदतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन व्हॉटस्अप चॅटबोर्ड आणि एक संकेत स्थळ तयार केले आहे. यावरून मतदारांना काही सेकंदात माहिती उपलब्ध होईल,' असे निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले.
निवडणुकीसाठी मतदारांना पोलिंग चीट देण्याचे काम शासकीय यंत्रणेकडून होत आहे. मतदारांना मतदार यादीमधील नाव शोधायचे असेल तर त्यासाठी ऑनलाइन सुविधा देण्यात आली आहे. जी. श्रीकांत म्हणाले, '९७६४८३११११ हा व्हॉट्सअप क्रमांक निर्धारित करण्यात आला आहे. या क्रमांकावर 'हाय' असे टाकल्यावर मतदाराकडून त्याच्या मतदार कार्डाचा क्रमांक विचारला जातो. हा क्रमांक टाकल्यावर काही सेकंदात त्याला मतदार यादीतील त्याने नाव आणि मतदान केंद्र याची माहिती मिळेल.'
त्याशिवाय www.csmcvotekar.com या संकेतस्थळावर जाऊन देखील मतदारांना त्यांचे नाव मतदार यादीमध्ये शोधता येणार आहे. एखाद्या मतदाराने कोणत्या उमेदवारांना मतदान करायचे हे मनोमन ठरवले तर जास्तीत जास्त तीस सेकंदांत त्याचे मतदान पूर्ण होईल, असा दावा जी. श्रीकांत यांनी केला.
'वयोवृद्ध मतदारांना, आजारी मतदारांना, दिव्यांग मतदारांना आणि गरोदर मातांना रांगेत उभे न राहता मतदान केंद्रात जाऊन थेट मतदान करता येणार आहे. त्यासाठी त्यांना मतदनीस दिला जाणार आहे. प्रत्येक मतदाराला स्वतंत्र मदतनीस असेल,' असेही त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis