
बीड, 13 जानेवारी, (हिं.स.) परळी नगरपालिकेत विचारधारेविरोधात एकत्रित येत करण्यात आलेली शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि एमआयएमची युती अखेर संपुष्टात आली. शिवसेना शिंदे गटाच्या इशाऱ्यानंतर एमआयएम पक्षाच्या नगरसेविका शेख आयेशा मोहसिन यांनी गटनेते वैजनाथ सोळंके यांना पत्र लिहून गटातून बाहेर पडण्याबाबतच्या कायदेशीर बाबी पूर्ण करण्यास सहकार्य करावे, असे नमूद केले आहे. यामुळे चार दिवसांपूर्वी अस्तित्वात आलेली ही युती तुटली आहे.
परळी नगरपालिकेसाठी गटनेत्यांची निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्र पक्षाच्या गटनेतेपदी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके यांची निवड झाली. ही निवड करताना परळी नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्र पक्षाच्या गटात मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत निवडून आलेल्या एमआयएमच्या सदस्या शेख आयेशा मोहसिन यांचा गटात समावेश केल्यानंतर राज्यभरात वादंग उठले होते. शिवसेनेवरही टीका होऊ लागली होती. आपल्याला विश्वासात न घेताच राष्ट्रवादीने एमआयएमला गटात घेतल्याचा आरोप सेनेकडून केला गेला होता.
एमआयएमला गटाबाहेर न काढल्यास आपण बाहेर पडू, असा इशारा शिवसेनेकडून दिला गेला होता. शिवसेनेचा हिंदुत्व बाणा जागा झाल्यानंतर एमआयएमच्या एकमेव सदस्याला गटाबाहेर काढण्याच्या हालचाली सुरु झाल्या. शेख आयेशा यांनी गटनेते वैजनाथ सोळंके यांना पत्र लिहून गटाबाहेर पडत असल्याचे सांगितले. एमआयएमच्या एक सदस्या बाहेर पडल्याने आता या गटात २३ जणांचा समावेश असणार आहे.
शेख आयेशा मोहसिन यांचे गटातुन बाहेर पडण्याबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे. याबाबत आमच्या सर्व नगरसेवकांची बैठक सुरु आहे. यात या सदस्याला गटाबाहेर करण्याचा निर्णय घेणार आहोत. असे गटनेते सोळंके यांनी सांगितले.
परळी नगरपालिकेत चार सदस्य स्वीकृत म्हणून जाणार आहेत. संख्याबळाची जुळवाजुळव करण्यात एमआयएमच्या सदस्यास गटात घेण्यात आल्याचे समजते, तरीही सदस्य पदासाठी मतदानाची वेळ आली तर एमआयएमच्या शेख आयेशा कुणाच्या बाजूने मतदान करणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis