रायगड : प्रा. किशोर लहारे यांना ‘साई जीवन समाजभूषण पुरस्कार’ प्रदान
रायगड, 13 जानेवारी (हिं.स.)। ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘साई जीवन समाजभूषण पुरस्कार’ वितरण सोहळा साईंच्या पावन भूमीत शिर्डी येथे भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या थाटामाटा
Professor Kishore Lahare awarded ‘Sai Jeevan Samaj Bhushan Award’


रायगड, 13 जानेवारी (हिं.स.)। ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘साई जीवन समाजभूषण पुरस्कार’ वितरण सोहळा साईंच्या पावन भूमीत शिर्डी येथे भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या सोहळ्यात प्रा. किशोर लहारे यांना ‘साई जीवन समाजभूषण पुरस्कार’ प्रदान केला गेला.

नुकताच झालेल्या या भव्य सोहळ्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. साईंच्या चरणी नतमस्तक होत उपस्थितांनी या सोहळ्याचा साक्षीदार होण्याचा अनुभव घेतला.

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते श्रीवर्धन तालुक्यातील गोखले महाविद्यालयाचे उपप्राचार्य व विद्यार्थीप्रिय प्राध्यापक किशोर लहारे यांचा झालेला सन्मान. सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना ‘साई जीवन समाजभूषण पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे, तसेच सामाजिक प्रश्नांवर संवेदनशील भूमिका घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणून प्रा. किशोर लहारे यांची ओळख आहे.

त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांना दिशा मिळाली असून शैक्षणिक क्षेत्रात नवे विचार रुजविण्याचे कार्य त्यांनी केले आहे. विद्यार्थी हितासाठी त्यांनी घेतलेली भूमिका आणि समाजाभिमुख उपक्रमांमधील सक्रिय सहभाग यामुळे त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरत आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याला सन्मानाची पोचपावती मिळाल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

पुरस्कार स्वीकारताना प्रा. किशोर लहारे यांनी साईबाबांचे आशीर्वाद, कुटुंबीय, सहकारी प्राध्यापक, शिक्षकवृंद व विद्यार्थी यांचे आभार मानले. भविष्यातही समाज व विद्यार्थी हितासाठी अविरत कार्य करत राहण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. शिर्डीच्या पावन भूमीत मिळालेला हा सन्मान श्रीवर्धन व रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण ठरला असून सर्व स्तरातून प्रा. किशोर लहारे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande