
नांदेड, 13 जानेवारी (हिं.स.)।मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडच्या सभेत गेल्या ७० वर्षात नांदेडचा विकास झाला नाही, असे जाहीरपणे सांगितले होते. या काळात कोणाची सत्ता होती. त्यांनी आजपर्यंत नांदेडला अविकसीत का ठेवले? असा सवाल करून नांदेडला अविकसीत ठेवणाऱ्यांना सत्तेतून खाली खेचा, असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ तरोडा कॅनॉल रोड येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी आ. बालाजी कल्याणकर, संध्याकल्याणकर, गंगाधर बडुरे, उमेश मुंडे, मंगेश कदम, अपर्णा नेरलकर यांच्यासह अनेकजण मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडच्या जाहीर सभेत गेल्या ७० वर्षात नांदेडचा विकास झाला नाही, असे जाहीरपणे सांगितले. या काळात कोणाची सत्ता होती. नांदेडला विकासापासून वंचित ठेवणाऱ्यांना यावेळी सत्तेतून खाली खेचावे, असे आवाहन सामंत यांनी केले.
सत्ता नसतानाही आ. बालाजी कल्याणकर यांनी शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणून १५०० कोटी रूपयांची विकास कामे केली. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी केलेली भ्रष्टाचाराची घाण साफ करण्यासाठी शिवसेनेला साथ द्या. मनपात शिवसेनेची सत्ता आल्यास महारोजगार मेळावे घेऊन हजारो बेरोजगारांना काम उपलब्ध करून देण्यात येईल. नांदेड उत्तरमध्ये कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येईल. मनपाची स्वतंत्र परिवहन व्यवस्था सुरू करण्यात येईल. महिला भगिनींच्या सुरक्षेसाठी शहरात सीसीटीव्ही लावण्यात येतील. आ. कल्याणकर यांनी नांदेडात कृषी महाविद्यालय, वाडी येथे उपजिल्हा रुग्णालय सुरू केले. जिजाऊ सृष्टी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे स्मारक त्यांच्यामुळेच सुरू झाले. ते एकटे नाहीत तर त्यांच्यामागे सर्व नांदेडकर आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे सर्व मंत्री त्यांच्या पाठिशी आहेत.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis