पहिल्या लोककला महोत्सवाचे विजेतेपद विद्यापीठाच्या संघाने पटकावले
छत्रपती संभाजीनगर, 13 जानेवारी (हिं.स.)। डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय लोककला महोत्सचाचा समारोप थाटात संपन्न झाला. .कुलगुरु डॉ.विजय फुलारी व रंगकर्मी डॉ.गणेश चंदनशिवं यांच्या हस्तेपारितोषिक वितरण करण्यात आले. कुलगु
पहिल्या लोककला महोत्सवाचे विजेतेपद  विद्यापीठाच्या संघाने पटकावले


छत्रपती संभाजीनगर, 13 जानेवारी (हिं.स.)। डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय लोककला महोत्सचाचा समारोप थाटात संपन्न झाला. .कुलगुरु डॉ.विजय फुलारी व रंगकर्मी डॉ.गणेश चंदनशिवं यांच्या हस्तेपारितोषिक वितरण करण्यात आले. कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी स्वतंत्र लोककला महोत्सव घेण्याचे गेल्या वर्षीच्या युवक महोत्सवात घोषित केले. महोत्सवाचे उद्घाटन प्रख्यात कवी प्रा.प्रशांत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. तर समारोप समारंभ विद्यापीठाच्या नाटयगृहात मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.अंकुश कदम, डॉ.योगिता होके पाटील, संचालक डॉ.कैलास अंभुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीचे प्रमुख, प्रख्यात रंगकर्मी डॉ.गणेश चंदनशिवे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विजेत्या संघास पारितोषिक वितरण करण्यात आले. संघप्रमुख डॉ दत्ता साकोळे व कलावंत दिशा सपकाळ यांनी मनोगत व्यक्त केले. कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या संकल्पनेतील पहिला लोककला महोत्सव यशस्वी झाल्याचे कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी प्रास्ताविकात सांगितले. डॉ.समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन तर डॉ.कैलास आंभुरे यांनी आभार मानले. पारितोषिकांचे वाचन डॉ.किशोर शिरसाठ व डॉ.समाधान इंगळे यांनी केले. उद्घाटन सोहळ्यात प्रा. प्रशांत मोरे यांच्या लोककवितांनी कलावंतांना मंत्रमुग्ध केले. तर समारोप समारंभात लोककलावंत डॉ. गणेश चंदनशिवे यांनी भारूडापासून सुरुवात करून बाजीराव मस्तानी या चित्रपटातील गाजलेल्या गीताने सांगता केली. तमाशा, भारुड, जलसा या कलाप्रकारांना सामावून घेणारी लोककला अकादमी आपल्या विद्यापीठात सुरू होत असल्याबद्दल डॉ.चंदनशिवे यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी ते म्हणाले, कुंभार जसे मडके घडवितो तसेच गुरु विद्यार्थी कलावंत यांना घडवीत असतो. आपल्यात असलेल्या प्रतिभेला जर खऱ्या अर्थाने बहर आणायचा असेल तर लाजरा बुजरा स्वभाव सोडून रंगमंचावर धीटपणे सामोरे जा, असे आवाहनही त्यांनी केले. माझ्या सारखा गावखेड्यातील मुलगा आज मुंबई विद्यापीठात मोठ्या पदावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामुळेच जाऊ शकला, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी तत्कालीन औरंगाबाद व आजच्या छत्रपती संभाजीनगर शहराची छक्कड सदर केली. राज्यातील सर्व २४ विद्यापीठांमधील विद्यार्थी लोककलांना एकाच मंचावर आणण्यासाठी कुलपती यांनी आपल्या विद्यापीठावर जबाबदारी टाकली आहे. नाटयगृहाच्या बाजुलाच स्वतंत्र लोककला अकादमी स्थापन करण्यात येणार असून वर्षभरात लोककला अकादमी कार्यान्वित करू, असे अध्यक्षीय समारोपात सांगितले. पुढील वर्षी लोककला महोत्सव सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्रात असलेल्या लोककलांची कार्यशाळा घेण्यात येईल. पुढील वर्षी तरी लोककला महोत्सवात विद्यार्थी कलावंत यांनी वेळ आणि शिस्त यांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande