नाहूरजवळ धावत्या लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू
मुंबई, 13 जानेवारी (हिं.स.)। मुंबईतील लोकल रेल्वेतील वाढती गर्दी पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. नाहूर स्थानक परिसरात धावत्या लोकलमधून पडल्याने मनीष बाळू लोखंडे या तरुणाचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी ही घटना घडली. मनीष हा माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये
Young Man Dies Moving Local Train Near Nahur


मुंबई, 13 जानेवारी (हिं.स.)। मुंबईतील लोकल रेल्वेतील वाढती गर्दी पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. नाहूर स्थानक परिसरात धावत्या लोकलमधून पडल्याने मनीष बाळू लोखंडे या तरुणाचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी ही घटना घडली. मनीष हा माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये टेक्निशियन म्हणून कार्यरत होता. त्याने कुर्ला येथून बदलापूरकडे जाणारी लोकल पकडली होती. रविवारी मेगाब्लॉकमुळे अनेक गाड्या उशिरा धावत होत्या आणि स्थानकांवर प्रचंड गर्दी उसळली होती. याच गर्दीमुळे मनीषला दरवाजात लटकून प्रवास करावा लागत होता.

दुपारी सुमारे १.५० वाजता लोकल नाहूर स्थानकाजवळ पोहोचत असताना त्याचा तोल जाऊन तो रुळांवर पडला. पडताना झालेल्या गंभीर दुखापतींमुळे तो जागीच जखमी झाला. त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर मार लागला. घटनेनंतर रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. या प्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रविवारी करण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकदरम्यान लोकल वाहतूक विस्कळीत होते आणि त्यामुळे निर्माण होणारी धक्काबुक्की, गर्दी आणि दरवाजात लटकून प्रवास करावा लागण्याची वेळ प्रवाशांवर येते, असा आरोप रेल्वे कर्मचाऱ्यांनी केला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा लोकलमधील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर टीका होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande