
पुणे, 15 जानेवारी (हिं.स.)।आज राज्यातील २९ महानगरपालिकेसाठी मतदानप्रक्रिया पार पडत आहे. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली असून, सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सकाळपासून सर्वच मतदान केंद्रावर मतदार मतदान करण्यासाठी येत असल्याचे चित्र आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रश्नासनाने खबरदारी म्हणून बंदोबस्त तैनात केला आहे. अशातच पुण्यातून एक खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याने ईव्हीएम मशिनबाबत आक्षेप नोंदवत गंभीर आरोप केला आहे. राज्यातील काही मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या तक्रारी समोर आल्या असतानाच आता पुण्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मतदान केंद्रावर पहिल्या तीन मतदानांनंतर चौथ्या मतदानाच्या वेळी मशीनवरील लाईटच लागली नाही, असा मोठा दावा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या दाव्यामुळे मतदान प्रक्रिया योग्य पद्धतीने झाली की नाही, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु