
बीड, 16 जानेवारी, (हिं.स.)। मनुष्याला आपले भाग्य बदलायचे असेल तर संत सेवा करणं ही काळाची गरज आहे. संत सेवेमध्ये मनुष्याचे भाग्य बदलण्याची ताकद असते. संत संगतीमुळे जीवनाचे कल्याण होते. संतांच्या संगतीत अर्धा क्षण जरी गेला तरी जीवनाचं कल्याण करण्याची ताकद संतांमध्ये आहे. मनुष्याच्या आयुष्यात कितीही वाईट परिस्थिती येऊ द्या, मनुष्याने संतांची संगती कधी सोडू नये. भाग्य बदलण्याची ताकद गुरुवर्य वैकुंठवासी किसन बाबा महाराज व शांती ब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांच्या सारख्या संतात आहे. असे प्रतिपादन हभप कविराज महाराज झावरे यांनी केले.
विसाव्या शतकातील महान संत गुरुवर्य वैकुंठवासी किसन बाबा महाराज यांच्या हस्ते व गुरुवर्य शांती ब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली धर्मनाथ बीज निमित्त अखंड हरिनाम सप्ताह मध्ये कीर्तन रुपी सेवाहरी किर्तन, प्रवचन, गाथा, भजन, ज्ञानेश्वरी पारायण, भावार्थरामायण, हरीजागर, काकडा भजन, विष्णुसहस्रनाम इत्यादी अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाविक देहभान हरपून गेले होते.
हभप कविराज महाराज झावरे यांनी ज्ञानेश्वरी पारायण, भावार्थरामायण, काकडा हरीजागर, विष्णुसहस्रनाम अशा भजन, विविध नामस्मरणाच्या भक्तीमय कार्यक्रमाने सुरुवात केली. श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे भक्तीचा मळा गुरुवर्य शांतीब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली फुलला आहे. श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे हभप कविराज महाराज झावरे यांच्या कीर्तन सेवेवेळी टाळकरी, माळकरी, विणेकरी, मृदुंगाचार्य, भजनी मंडळी, गायनाचार्य भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis