
रत्नागिरी, 16 जानेवारी, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्हा पोलिसांकडून तक्रारदाराला तपासाची माहिती थेट मोबाइलवर देणारी मिशन प्रगती मोहीम राबविण्यात येत आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनांनुसार, रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने नागरिक केंद्रित पोलिसिंग, पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सार्वजनिक सुरक्षेच्या उद्देशाने अनेक विशेष मिशन, प्रोजेक्ट व डिजिटल अॅप्लिकेशन्स सुरू केली आहेत. या उपक्रमांमध्ये पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वास दृढ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मिशन प्रगती हा एक विशेष लोकाभिमुख उपक्रम अमलात आणलेला आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून जिल्ह्यामधील सर्व पोलीस ठाण्यांत प्राप्त झालेल्या विविध तक्रारींचे पुढे काय झाले, आपण दिलेल्या तक्रारीबाबत पुढे तपास कसा होत आहे, याबाबत तक्रारदाराला माहिती देणे सुलभ करण्याच्या उद्देशाने मिशन प्रगती हा विशेष लोकाभिमुख उपक्रम आहे.
अनेकवेळा नागरिकांनी दाखल केलेल्या आपल्या तक्रारी अथवा एफआयआरचे पुढे काय झाले, त्या तक्रारीचा तपास पुढे कुठपर्यंत पोहोचला आहे, काय कार्यवाही झाली आहे, याबद्दल ते अनभिज्ञ असतात व त्याबद्दल त्यांना पुढे अधिक माहिती मिळत नाही. जिल्ह्यात जेवढ्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत किंवा होत आहेत त्यांच्यासाठी हा उपयुक्त उपक्रम आहे. बऱ्याच वेळा तक्रारदाराला संबंधित पोलीस ठाण्यात जावे लागते. वारंवार पोलीस ठाणे येथे जावे लागल्यामुळे काही प्रमाणात अनावश्यक त्रास सहन करावा लागतो. हा त्रास टाळण्यासाठी तसेच आपल्या तक्रारीच्या तपासाची पारदर्शक व वेळेवर माहिती मिळावी तसेच तपास पुढे कसा होत आहे हे जाणून घेण्याच्या उद्देशाने मिशन प्रगती उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या मिशनअंतर्गत तक्रारदारांना, फिर्यादींना तपासाची सद्यःस्थिती WhatsApp व SMS च्या माध्यमातून थेट कळविण्यात येते. आतापर्यंत सुमारे 1,450 फिर्यादींना रत्नागिरी पोलीस दलामार्फत 4,508 संदेश पाठविण्यात आले आहेत. या मिशनचे कामकाज पोलीस अधीक्षक कार्यालय अंतर्गत नेमण्यात आलेले पोलीस 2 पोलीस अंमलदार करत आहेत.मिशन प्रगती या उपक्रमामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण अथवा त्रुटी आढळल्यास नागरिकांनी थेट पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी