गडचिरोली - खनिज निधीतील विविध विकासकामांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
गडचिरोली, 16 जानेवारी, (हिं.स.) जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी अंतर्गत एटापल्ली तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांची जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी काल प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान दुर्गम भागातील महिला बचत गटांमार्फत राबविण्यात येणा
पाहणी करतांना जिल्हाधिकारी पांडा


गडचिरोली, 16 जानेवारी, (हिं.स.) जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी अंतर्गत एटापल्ली तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांची जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी काल प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान दुर्गम भागातील महिला बचत गटांमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक करत शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

या तालुका दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी जीवनगट्टा येथे महिला सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या आळिंबी (मशरूम) उत्पादन उपक्रमास भेट देऊन पाहणी व मार्गदर्शन केले. जय पेरसापेन महिला बचत गटासह एकूण सहा महिला बचत गटांमार्फत उभारण्यात आलेल्या आळिंबी उत्पादन युनिटची पाहणी करताना त्यांनी उत्पादन प्रक्रिया, क्षमता व विक्री संधींचा सविस्तर आढावा घेतला. सर्व युनिट्सची उभारणी पूर्ण होऊन प्रत्यक्ष उत्पादन सुरू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. ग्रामीण व दुर्गम भागातील महिलांसाठी हा उपक्रम प्रेरणादायी असून यामधून नियमितपणे आर्थिक उत्पन्नाचा मार्ग खुला होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी जीवनगट्टा येथील आदिवासी लक्ष्मी महिला बचत गट केंद्रास भेट देऊन मोहफुलांपासून तयार होणाऱ्या विविध उत्पादनांची पाहणी केली. तसेच धिंगरी आळिंबी उत्पादन व विक्री केंद्रास भेट देत महिलांशी संवाद साधून बाजारपेठ जोडणी, मूल्यवर्धन व विक्री वाढीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. वंदना गावडे यांनी बचत गटामार्फत मोहाचे लाडू, ज्वारीचे लाडू तसेच विविध पौष्टिक पदार्थ तयार करून देशभर विक्री केली जात असल्याची माहिती दिली.

यानंतर बायफ मित्र संस्था, एटापल्ली येथील मत्स्यपालन संस्थेस भेट देऊन मत्स्यपालन साहित्याचे वितरण करण्यात आले. मौजा डुम्मे येथे डीएमएफ निधीतून मंजूर इंधन विहिरीची प्रत्यक्ष लाभार्थ्याच्या शेतात पाहणी करण्यात आली. तसेच मौजा जवेली (म.) येथे शेतकरी श्रीमती हर्षा सुंदरशहा कुमरे यांच्या कुक्कुटपालन केंद्रास भेट देऊन उपक्रमाची प्रगती तपासण्यात आली.

कौशल्य विकास केंद्र उभारणीच्या दिरंगाईबाबत नाराजी

एटापल्ली येथे खनिज निधीतून उभारण्यात येत असलेल्या नवीन कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राच्या सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी करताना जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासकीय मान्यता मिळूनही व निधी उपलब्ध असूनही बांधकाम वेळेत सुरू न केल्याचे निदर्शनास आले. याबाबत संबंधित कार्यकारी अभियंता यांना कारणे दाखवा नोटीस बजावून पुढील कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. विकासकामांमध्ये दिरंगाई व निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

दौऱ्याच्या शेवटी उपविभागीय कार्यालय, एटापल्ली येथे तालुकास्तरीय यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने व ठरविलेल्या कालमर्यादेत कामे पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

यावेळी उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अमर राऊत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती प्रीती हिरळकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. इब्रान शेख, तहसीलदार श्री. हेमंत गांगुर्डे, गट विकास अधिकारी डॉ. आदिनाथ आंधळे, तालुका कृषी अधिकारी अरुण वसवाडे, एच. के. राऊत, समीर पेदापल्लीवार यांच्यासह विविध शासकीय अधिकारी-कर्मचारी, महिला बचत गटांच्या सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande