
नवी दिल्ली , 16 जानेवारी (हिं.स.)।भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी शुक्रवारी उज्जैन येथे भगवान शिवाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला आणि देशाच्या सुख-शांती, समृद्धी आणि यशासाठी प्रार्थना केली.
गंभीरने भगवान शिवाची प्रार्थना करण्यासाठी शुक्रवारी महाकाल मंदिरात भेट दिली. यावेळी गंभीर यांनी उज्जैनमधील विश्वविख्यात ज्योतिर्लिंग महाकालेश्वर मंदिरात पहाटे ४ वाजता होणाऱ्या दिव्य भस्मआरतीत सहभाग घेतला. याशिवाय, त्यांनी नलखेड़ा येथील विश्वप्रसिद्ध मां बगलामुखी देवीचेही दर्शन घेतले. मंदिरात त्यांनी विशेष पूजा-अर्चा केली. या पूजेदरम्यान गंभीर यांनी देशाच्या सुख-शांती, समृद्धी आणि यशासाठी प्रार्थना केली. यावेळी मंदिर समितीचे पदाधिकारी तसेच अनेक भाविक उपस्थित होते.
दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना रविवारी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सध्या ही मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाचा हा सामना जिंकून मालिका 2-1 अशी आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न असेल.पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने सहा चेंडू शिल्लक असताना चार गडी राखून न्यूझीलंडवर विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने दमदार पुनरागमन करत सात गडी राखून विजय मिळवून मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. त्यामुळे रविवारी होणाऱ्या निर्णायक सामन्यात मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.आतापर्यंत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकूण 122 एकदिवसीय सामने खेळवले गेले आहेत. यापैकी भारताने 63 तर न्यूझीलंडने 51 सामने जिंकले आहेत, तर सात सामन्यांचा निकाल लागलेला नाही. सध्या दोन्ही संघ उत्तम फॉर्ममध्ये असून मालिका जिंकण्यासाठी रविवारी होणाऱ्या सामन्यात जोरदार संघर्ष अपेक्षित आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode