
नाशिक, 15 जानेवारी (हिं.स.)। नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथे रविवार दिनांक ११ जानेवारी ते १५ जानेवारी, २०२६ दरम्यान आयोजित महाराष्ट्र राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेची आज यशस्वी सांगता झाली. नाशिकच्या गंगापूर रोड येथील केन्सिंगटन क्लब येथे खेळल्या गेलेल्या या स्पर्धेमध्ये ३५ वर्षे ते ७५ वर्षे पर्यंत विविध नऊ वयोगटाचा समावेश होता.
पहिले तीन दिवस चार वयोगटांचे सामने पार पडले, तर दिनांक १३, १४ आणि आज १५ रोजी ३५ वर्षे, ४० वर्षे, ४५ वर्षे आणि ५० वर्षे या वयोगटाच्या स्पर्धा पार पडल्या. आज या सर्व गटांचे अंतिम सामने खेळविले गेले. यामध्ये पुरुषांच्या ४५ वर्षे गटामध्ये नाशिकचा विक्रांत करंजकर आणि सांगलीचा सचिन सारडा या जोडीने सुंदर खेळाचे प्रदर्शन करून अंतिम सामन्यात पुणेच्या धीरेन देसाई आणि विवेक कांचन यांना २१-०८ आणि २१- ११ असे सरळ दिन सेटमध्ये पराभूत करून या गटामध्ये दुहेरीचे विजेतेपद पटकावले. पुरुषांच्या ४० वर्षे गटामध्ये एकेरी प्रकारात प्रथम मानांकन असलेला मुंबई शहरचा निगेल दास दुसरे मानांकन असलेला नाशिकचा चंदन जाधव यांच्यात अंतिम सामना खेळविला गेला. या सामन्यात आपल्या दर्जाप्रमाणे सुरवातीला दोघांही खेळाडूंमध्ये चुरस दिसून अली. पहिल्या सेटमध्ये गुणसंख्या ८-८ बरोबरीत होती. त्यानंतर मात्र निगेल दासने आक्रमक खेळ करत आघाडी मिळवत पहिला सेट २१- ११ असा जिंकून आघाडी मिळविली. दुसऱ्या सेटमध्येही निगेलने हीच लय कायम राखत दुसरा सेट २१- १५ असा जिंकून विजेतेपद मिळविले.
नाशिकच्या चंदन जाधव याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागेल. पुरुषांच्या ३५ वर्षे गटामध्ये एकेरी प्रकारात मुंबई उपनगरच्या जसविंदर सिंग याने सातारच्या तिसरे मानांकन असलेल्या ओंकार पालेकर याचा २-० असा पराभव करून विजेतेपद मिळविले. ४५ वर्षे गटामध्ये एकेरी प्रकारात नागपूरच्या जयेंद्र ढोले याने अंतिम लढतीत पुणेच्या विनीत दाबकंचा २-० असा पराभव करून विजेतेपद पटकावले. ५० वर्षे एकेरीमध्ये सातारच्या निलेश फणसाळकर याने अटीतटीच्या अंतिम लढतीत सुंदर खेळ करत पुणेच्या अमित तारे याच्यावर २१-१५, १६-२१ आणि २१-१८ अशी २-१ च्या फरकाने विजय मिळवत विजेतेपद आपल्या नांवे केले. महिलांमध्ये मुंबईचे वर्चस्व :- महिलाच्या गटात विविध गटामध्ये मुंबईच्या खेळाडूंनी सुंदर खेळ करत विजेतेपदावर आपले नांव कोरले. ३५ वर्षे एकेरीमध्ये मुंबई उपनगरच्या वरदा दीक्षित आणि पल्लवी मित्तल यां मुंबईच्या खेळाडूंमध्येच झालेली अंतिम लढत चांगलीच रंगतदार झाली.
पहिला सेट पल्लीवीने २१-१९ असा जिंकला, तर दुसरा सेट वरदाने २१- १८ असा जिंकीन १-१ अशा बरोबरी साधली. तिसऱ्या निर्णायक सेटमध्ये १२-१२ अशी बरोबरी होती. त्यानंतर मात्र वरदा दीक्षित हीने सयंमाने खेळ करत हा सेट २१- १६ असा आपल्या नांवे करत या गटाचे विजेतेपद पटकावले. ४० वर्षे गटामध्ये मुंबई शहरच्या फराह त्रेहानने आपल्याच जिल्ह्याच्या रम्या वेंकट हीला २१-१८, १९-२१ आणि २१-१६ असे २-१ च्या फरकाने पराभूत करून या गटाचे विजेतेपद मिळविले. ५० वर्षे गटामध्ये मुंबई उपनगरच्याच सरिता जेठवाणी आणि वसुमताई सेथुरामन यांच्यात झालेल्या अंतिम लढतीत सरिता जेठवाणीने वर्चस्व राखत हा सामना २-० असा जिंकून विजेतेपद मिळविले. महिलांच्या ४५ वर्षे गटामध्येही मुंबई उपनगरच्याच खेळडूंमध्ये अंतिम लढत खेळली गेली. यामध्ये सोनल भट्टड हीने पूजा साईराम हिला २१-१२ आणि २१-१८ असे २-० ने पराभूत करून विजेतेपद मिळविले. पुरुषांच्या दुहेरीमध्ये ४० वर्षे वयोगटात पुणेच्या अक्षय गद्रे आणि जयंत पारखी या जोडीने अंतिम लढतीत मुंबईच्या आदित्य पांडे आणि दीपक जेटली यांना २-० असे पराभूत करून विजेतेपद मिळविले. तर ५० वर्षे गटामध्ये दुहेरी प्रकारात निलेश फणसाळकर (सातारा) आणि शिवकिरण ठाकूर (पुणे) या जोडीने अंतिम लढतीत ठाणेच्या मुरुकन विश्वमानी आणि राकेश राघवाणी या जोडीला पराभूत करून विजेतेपद मिळविले.
या सर्व गटामध्ये विजेतेपद आणि उपविजेतेपद मिळविणाऱ्या खेळाडूंना प्रमुख पाहुणे केन्सिंग्टन क्लबचे संचालक विक्रांत मते, नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष राधेश्याम मुंदडा, उपाध्यक्ष डॉ. शर्मिला कुलकर्णी, सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते आणि जिल्हा सचिव पराग एकांडे, उपाध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष योगेश एकबोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आकर्षक चषक आणि प्रमाणपत्र प्रदान करून गौरवण्यात आले. या स्पर्धा महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या अधिकृत नियमावलीनुसार खेळविल्या गेल्या. या स्पर्धेला योनेक्स सनराईस यांनी पुरस्कृत केले आहे. या स्पर्धाच्या सूत्रबद्ध आयोजनासाठी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे आणि नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
अंतिम निकाल :-
पुरुष ३५ वर्षे -१) जसविंदर सिंग (मुंबई) - विजेता , २) ओंकार पालेकर ( सातारा) - उपविजेता. ४० वर्षे -१) निगेल दास (मुंबई) - विजेता , २) चंदन जाधव ( नाशिक) - उपविजेता. ४५ वर्षे -१) जयेंद्र ढोले (नागपूर) - विजेता , २) विनीत दाबक ( पुणे ) - उपविजेता. ५० वर्षे -१) निलेश फणसाळकर (सातारा ) - विजेता , २) अमित तरे (पुणे) - उपविजेता. महिला :- ३५ वर्षे -१) वरदा दीक्षित (मुंबई) - विजेती, २) पल्लवी मित्तल (मुंबई) - उपविजेती. ४० वर्षे -१) फराह त्रेहान (मुंबई) - विजेती , २) रम्या वेंकट (मुंबई) - उपविजेती. ४५ वर्षे -१) सोनक भट्टड (मुंबई) - विजेती, २) पूजा साईराम (मुंबई ) - उपविजेती. ५० वर्षे -१) सरिता जेठवानी (मुंबई ) - विजेती, २) वसुमती सेथुरामन (मुंबई) - उपविजेती .
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV