
नवी दिल्ली, 15 जानेवारी (हिं.स.)लक्ष्य सेनने आपली प्रभावी कामगिरी सुरू ठेवली आणि इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पण सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरुष दुहेरी जोडीला पराभवाचा सामना करावा लागला. किदाम्बी श्रीकांत आणि एस.एच. प्रणॉय यांनीही पुरुष एकेरी गटात आपापले सामने गमावले.
२०२१ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक विजेत्या लक्ष्यने दुसऱ्या फेरीत जपानच्या केंटा निशिमोटोचा २१-१९, २१-११ असा पराभव करून एकेरी स्पर्धेत एकमेव भारतीय आव्हानात्मक खेळाडू म्हणून उदयास येत लचकता आणि परिपक्वता दाखवली. त्याचा पुढचा सामना चिनी तैपेईच्या लिन चुन-यीशी होईल, ज्याने आयर्लंडच्या न्हाट न्गुयेनचा २१-१६, २१-१७ असा पराभव केला. लक्ष्यने सुरुवातीला संघर्ष केला, ज्यामुळे निशिमोटोला नियंत्रण मिळवता आले आणि १६-११ अशी आघाडी मिळाली. पण १४-१८ ने मागे पडल्यानंतर, सेनने उल्लेखनीय संयम दाखवला, रॅली लांबवल्या, चांगला बचाव केला आणि त्याच्या प्रतिस्पर्ध्याला चुका करायला भाग पाडले. सलग पाच गुणांमुळे सामना लक्ष्यच्या बाजूने झुकाल. आणि त्याने पहिल्याच संधीवर खेळ संपवला. दुसरा गेम एकतर्फी झाला, कारण लक्ष्यने आपली रणनीती बदलली आणि निशिमोटोला गती मिळण्यापासून रोखले. त्याच्या मजबूत बचाव आणि अचूक शॉट निवडीमुळे, लक्ष्यने ५० मिनिटांत सामना जिंकला.
िवजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे सात्विक आणि चिराग दुसऱ्या फेरीत जपानच्या हिरोकी मिदोरिकावा आणि क्योहेई यामाशिता यांच्याकडून २७-२५, २१-२३, १९-२१ असा पराभव पत्करावा लागला. दरम्यान, श्रीकांतने जोरदार लढत दिली पण फ्रान्सच्या क्रिस्टो पोपोव्हकडून २१-१४, १७-२१, २१-१७ असा पराभव पत्करावा लागला. प्रणॉयनेही आपल्या प्रतिस्पर्ध्याला कडवी झुंज दिल्यानंतर आठव्या मानांकित सिंगापूरच्या लोह कीन यूकडून १८-२१, २१-१९, २१-१४ असा पराभव पत्करावा लागला. महिला एकेरीच्या सामन्यात मालविका बनसोडला पाचव्या मानांकित चीनच्या हान यूकडून १८-२१, १५-२१ असा पराभव पत्करावा लागला. महिला दुहेरीतही भारताचे आव्हान संपुष्टात आले कारण त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना ८४ मिनिटे चाललेल्या मॅरेथॉन सामन्यात सातव्या मानांकित चीनच्या ली यिजिंग आणि लुओ झुमिन यांच्याकडून २२-२०, २२-२४, २१-२३ असा पराभव सहन करावा लागला.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे