
बुलावायो, 15 जानेवारी (हिं.स.)हेनिल पटेलच्या ५ विकेट्सच्या जोरावर भारतीय युवा संघाने अंडर-१९ विश्वचषक २०२६ मोहिमेची सुरुवात विजयाने केली. पहिल्या सामन्यात भारताने अमेरिकेचा ६ विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेचा संघ १०७ धावाच करु शकला होता. पावसामुळे सामना थांबला तेव्हा भारतीय संघ फक्त ४ षटके खेळला होता.
सामना पुन्हा सुरू झाला तेव्हा सामना ३७ षटकांपर्यंत कमी करण्यात आला. डीएलएस पद्धतीने भारतासमोर ९६ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. भारताने १७.२ षटकांत ४ विकेट्स गमावून लक्ष्य पार केले.
भारताकडून यष्टिरक्षक-फलंदाज अभिज्ञान कुंडूने ४१ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकार मारत नाबाद ४२ धावा केल्या. कनिष्क चौहान १४ चेंडूत १० धावा करून नाबाद राहिला. त्याआधी, १०८ धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताची सुरुवात खराब झाली. तिसऱ्या षटकात सलामीवीर वैभव सूर्यवंशीला ऋत्विक अप्पीडीने बाद केले. वैभव सूर्यवंशीने ४ चेंडूत २ धावा काढल्या.
त्यानंतर पावसामुळे सामना थांबवण्यात आला. सामना पुन्हा सुरू होताच भारताने त्यांची दुसरी विकेट गमावली. वेदांत त्रिवेदी २ धावा काढून बाद झाला. पुढच्याच षटकात कर्णधार आयुष म्हात्रे झेलबाद झाला. भारतीय कर्णधाराने १९ चेंडूत ४ चौकारांसह १९ धावा काढल्या. भारताची चौथी विकेट विहान मल्होत्राच्या रूपात गेली. विहानने १७ चेंडूत १८ धावा केल्या.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या अमेरिकेची सुरुवात खराब झाली. संघाने नियमित अंतराने विकेट गमावल्या, ज्यामुळे त्यांना सावरण्याची संधी मिळाली नाही. दुसऱ्या षटकात अमरिंदर गिल (१) हेनिलच्या गोलंदाजीवर वैभवने झेलबाद केला. त्यानंतर साही गर्गने १६ धावा केल्या. कर्णधार उत्कर्ष श्रीवास्तवला हेनिलने बोल्ड केले. त्याला खातेही उघडता आले नाही.
यष्टिरक्षक अर्जुन महेशने 16, अमोघ आरेपल्लीने 3, अदनीत झांबने 18, आदित कप्पाने 5, सबरीश प्रसादने 7 धावांचे योगदान दिले. ऋषभ शिंपीने खाते उघडले नाही. नितीश सुदिनीने 36 धावा केल्या. वैभव सूर्यवंशीने त्याची विकेट घेतली. हेनिल पटेलने 7 षटकात 16 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. दीपेश दीपेंद्रन, आरएस अंबरीश, खिलन पटेल आणि वैभव सूर्यवंशी यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतली.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे