
अमरावती, 17 जानेवारी (हिं.स.)। अचलपूर नगरपालिकेत नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्षांनी मोठ्या उत्साहात पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्याच दुसऱ्या दिवशी पालिकेतील कारभार पूर्णतः ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. कार्यालयात एकही कर्मचारी उपस्थित नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची कामे रेंगाळली असून, मोठ्या अपेक्षेने आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत नागरिकांनी विकासाच्या अपेक्षेने आपले प्रतिनिधी निवडून दिले आहेत. मात्र पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच कार्यदिवशी प्रशासन आणि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शुक्रवारी पालिकेच्या परिसरात नागरिकांचा रोष स्पष्टपणे दिसून आला.
मिळालेल्या माहितीनुसार, अचलपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी धीरजकुमार गोहाड यांनी बहिरम येथे खासगी स्वरूपाच्या पार्टीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी नगरपालिकेतील सर्व नगरसेवक, पदाधिकारी तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. परिणामी संपूर्ण नगरपालिका दिवसभर सुमसाम होती. कार्यालयातील खुर्च्या रिकाम्या, कर्मचारी गैरहजर आणि नागरिक मात्र वाऱ्यावर अशी स्थिती निर्माण झाली.
विशेष बाब म्हणजे शनिवार व रविवार हे सुट्टीचे दिवस असताना असा कार्यक्रम कार्यदिवशी आयोजित करणे कितपत योग्य होते, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी प्रशासनाकडून झालेल्या या प्रकारामुळे अचलपूर नगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी