
छत्रपती संभाजीनगर, 17 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर शहरात चार जागांवर विजय मिळवत वंचित बहुजन आघाडीने महानगरपालिकेत प्रवेश केला आहे. शहरातील वीसपेक्षा अधिक जागांवर 'वंचित'ने लक्षणीय मते घेतली. प्रभाग तीनमधून 'वंचित'चे उमेदवार अमित भुईगळ, करुणा जाधव, जरीना कुरेशी आणि अफसर खान विजयी झाले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वंचित बहुजन आघाडीने दमदार प्रवेश केला. पक्षाची मतपेढी निश्चित असल्यामुळे काही प्रभागांत 'वंचित'च्या उमेदवारांना चांगली मते मिळाली. पक्षाने ६२ अधिकृत उमेदवार दिले. त्यापैकी दहा मुस्लिम उमेदवार होते. पक्षाने पाच अपक्षांना अधिकृत पाठिंबा दिला होता. पक्षनेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर सभेतून 'वंचित' सोबत येण्याचे मुस्लिम
मतदारांना आवाहन केले होते. 'एमआयएम'च्या प्रचाराचा झंझावात असतानाही वंचित बहुजन आघाडीने शहरातील प्रमुख वसाहती पिंजून काढल्या. पक्षाच्या वरिष्ठ नेत्या अंजली आंबेडकर यांनी कॉर्नर सभा घेतल्या होत्या. युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या पदयात्रांनी वातावरण ढवळून काढले होते. विशेषतः तरुण मतदारांना आपल्याकडे खेचण्यात सुजात यांना यश आले. यातून 'वंचित' चांगले यश मिळविणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. प्रभाग तीनमध्ये अमित भुईगळ (मते ६७३५), करुणा जाधव (मते ६३४९), जरीना कुरेशी (मते ६१०७) आणि अफसर खान (मते ६६८१) यांनी विजय मिळवला. पूर्ण पॅनल विजयी करण्यात उमेदवारांना यश आले.प्रभाग २४ मध्ये 'वंचित' चे उमेदवार काही फेऱ्यापर्यंत आघाडीवर होते. चार उमेदवारांनी विजय मिळवल्यामुळे मनपात वंचित बहुजन आघाडीचा प्रवेश झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis