
परभणी, 17 जानेवारी (हिं.स.)। संपूर्ण राज्यात महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत भारतीय जनता पार्टीने प्रचंड असे यश प्राप्त केले खरे, परंतु परभणी महापालिकेत शिवसेनेच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाने काँग्रेसबरोबर आघाडी करीत 65 जागांपैकी शिवसेना उबाठाने सर्वाधिक म्हणजे 25 तर काँग्रेसने 12 असे एकूण 37 जागा पटकावून आघाडीने स्पष्ट असे बहुमत प्राप्त केले आहे.
गेल्या 36 वर्षापासून बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्या परभणीत शिवसेनेस या निवडणूकीच्या निमित्ताने महापालिकेवर पहिल्यांदाच सर्वाधिक संख्याबळ पाठोपाठ आघाडीतून स्पष्ट असे बहुमत प्राप्त करीत झेंडा फडकविण्यात यश मिळाले आहे.
या सार्वत्रिक निवडणूकीत शिवसेना उबाठा गटाने ऐनवेळी काँग्रेसबरोबर आघाडी करीत स्थानिक राजकीय वर्तूळास हलकासा झटका दिला. पाठोपाठ सर्वाधिक उमेदवार रिंगणात उतरविले. त्यातसुध्दा मुस्लिम समाजास मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधीत्व दिले. कधी नव्हे एवढे मुस्लिम उमेदवार हे शिवसेनेच्या तिकीटावर तर दलित समाजाचे प्राबल्य असणार्या समाजामधूनसुध्दा शिवसेनेने सक्षम असे दलित समाजाचे उमेदवार रिंगणात उतरवून स्थानिक राजकीय वर्तूळास दुसरा झटका दिला.
त्या पाठोपाठ स्थानिक आमदार डॉ. राहुल पाटील व खासदार संजय जाधव या दोघांनी या उमेदवारी वाटपात त्या त्या प्रभागांमधील जातीपातीची गणिते, राजकीय समिकरणे, भौगोलिक क्षेत्र ओळखून सक्षम असे उमेदवार रिंगणात उतरविले. ते करतेवेळी काही प्रभागांमधून ऐनवेळी अन्य पक्षातील उमेदवारांनासुध्दा आयात केले. दोन प्रभागांमध्ये काँग्रेसजणांबरोबर तडजोड करता आली नाही. त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय घेतला व अन्यत्र आघाडी केली. त्याचा परिणाम या निवडणूकीत शिवसेना उबाठा व काँग्रेस आघाडी सक्षमपणे उभी राहीली. त्यामुळेच निवडणूकीच्या प्रारंभापासूनच ही आघाडी निश्चितच चांगलं यश मिळवेल, असा सूर स्थानिक राजकीय वर्तूळातून व्यक्त होत होता. विशेषतः या आघाडीस महायुतीतील शिवसेना शिंदे गट व भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असे एकत्रितपणे आव्हान देतील, असे सकृतदर्शनी चित्रसुध्दा दिसून आले नाही. शिवसेना शिंदे गट व भाजपाने युतीचा प्रयत्न केला. परंतु, जागा वाटपात मेळ बसला नाही. त्यामुळेच या निवडणूकीत शिवसेना उबाठा व काँग्रेस आघाडीने प्रारंभापासूनच मोठी आघाडी मारली अन् पडद्याआड मोठ्या प्रमाणावर खेळ्या करीत या आघाडीने या महापालिकेत स्पष्ट असे बहुमत प्राप्त केले आहे.
शिवसेनेच्या 37 वर्षांच्या या इतिहासात शिवसेनेने कधीही दोन अंकीसंख्यासुध्दा गाठली नव्हती. परंतु, या निवडणूकीत 65 पैकी सुमारे 25 जागा पटकावल्या व सर्वात मोठा पक्ष म्हणून बहुमान मिळविला. या निवडणूकीत काँग्रेसबरोबरील आघाडी शिवसेनेस पोषक ठरली. परंतु, काँग्रेसजणांना या निवडणूकीत तडाखा बसला. गेल्या निवडणूकीत काँग्रेसचे 31 सदस्य निवडून आले होते. यावेळी केवळ 12 जागांवरच काँगे्रसजणांना समाधान मानावे लागले. तर राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या निवडणूकीत 18 जागा पटकावल्या होत्या. या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या आघाडीस केवळ 11 जागा मिळाल्या.
भारतीय जनता पार्टीने या निवडणूकीच्या माध्यमातून विजयाचा संकल्प सोडला होता. त्यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्री या नात्याने सौ. मेघना साकोरे बोर्डीकर यांनी पुढाकार घेतला होता. ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व भाजपात नव्याने पदार्पण केलेले ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्यामुळे यावेळी महापालिकेत निश्चितच यश मिळेल, असा दावाही होत होता. परंतु, गेल्या निवडणूकीत 8 जागा पटकावलेल्या भाजपास या निवडणूक केवळ 12 जागांचा पल्ला गाठता आला. गेल्या निवडणूकीच्या तूलनेत केवळ 4 जागा अधिक मिळविता आल्या. भारतीय जनता पार्टी अंतर्गत नेतेमंडळीतील असमन्वय, बंडखोरी या निवडणूकीत भाजपास भोवली.
त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाबरोबर युती न करण्याचाही निर्णय भोवला. त्यामुळे भाजपाचे किमान 8 ते 10 उमेदवार अपयशी ठरले. तर शिवसेनेचे नेते आनंद भरोसे यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेऊन समर्थकांच्या मागे पाठबळ उभे करण्याचे प्रयत्न केले खरे, परंतु, शिवसेना शिंदे गटास एकही जागा पटकावता आली नाही. युतीअभावी या दोन्ही पक्षाच्या पदरात अपयश पडले आहे.
या निवडणूकीत आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली यशवंत सेनेने काही उमेदवार रिंगणात उतरविले खरे, परंतु केवळ एका जागी यश प्राप्त करता आले. या आघाडीचे सर्वेसर्वा सचिन देशमुख व त्यांच्या सौभाग्यवती हे दोघेही निवडणूकीत पराभूत झाले. ज्येष्ठ नेते विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाने प्रभाग क्रमांक 11 मधील तीन जागा पटकावून या महापालिकेत प्रवेश केला. तर एका अपक्षासही यश मिळविता आले आहे.
माजी महापौरांसह दोघे उपमहापौर सभागृहात...
माजी मंत्री व भाजपाचे नेते सुरेश वरपुडकर यांच्या सौभाग्यवती तथा माजी महापौर मीनाताई वरपुडकर यांनी प्रभाग क्रमांक 5 मधून मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला. दुसर्यांदा पालिकेत प्रवेश केला. तर माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे यांनी प्रभाग क्रमांक 9 मधून व सय्यद समी उर्फ माजू लाला यांनी काँग्रेस ऐवजी शिवसेना उबाठा गटामार्फत निवडणूक लढवून प्रभाग क्रमांक 8 मधून मोठे यश पटकावले. माजी महापौर सौ. अनिता सोनकांबळे यांचे पती रविंद्र सोनकांबळे हे या निवडणूकीत पराभूत झाले आहेत.
अनेक ज्येष्ठ सदस्य पुन्हा सभागृहात...
या निवडणूकीच्या माध्यमातून अनेक ज्येष्ठ नगरसेवक पुन्हा सभागृहात परतले आहेत. त्यात व्यंकट डहाळे, गणेश देशमुख, तिरुमला खिल्लारे, सुनील देशमुख, गुलमीर खान, अखिल काझी, अतूल सरोदे, रितेश झांबड, आकाश लहाने, भगवान वाघमारे, दिलीप ठाकूर, नदीम इनामदार, विजय जामकर, बाळासाहेब बुलबुले, शाम खोबे वगैरे स्वतः किंवा कुटूंबियातील सदस्यांच्या माध्यमातून सभागृहात परतले आहेत.
अनेक ज्येष्ठ सदस्य पराभूत...
प्रसाद नागरे, श्रीमती जयश्री खोबे, माजी नगराध्यक्ष बंडू पाचलिंग, सतीश नगरसाळे, शिवकुमार लाटकर, लक्ष्मीकांत क्षीरसागर, सचिन देशमुख, नागेश सोनपसारे, सचिन अंबिलवादे, शंकर नाईकनवरे, रामेश्वर कानडे, सुशील कांबळे, मंगल मुदगलकर, विकास लंगोटे, सौ. अश्विनी वाकोडकर वगैरे सदस्य किंवा त्यांच्या कुटूंबातील माजी सदस्यांना या निवडणूकीत पराभवाचा सामना करावा लागला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis