
रायगड, 17 जानेवारी (हिं.स): निवडणूक आचारसंहिता लागू असतानाही नेरळ शहरात तिचा सातत्याने भंग होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. नेरळ जकात नाक्याजवळ राजकीय बॅनर न लावता, मात्र पदाचा वापर करून बॅनरबाजी केल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. बॅनरवर थेट राजकीय पक्षाचे नाव किंवा चिन्ह नसले तरी संबंधित व्यक्तीच्या भूषविलेल्या पदाचा उल्लेख करून अप्रत्यक्ष प्रचार केला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
काल शिवाजी चौक तसेच अंबिका भुवन नाका येथील अशाच प्रकारच्या बॅनरबाजीबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्या ठिकाणचे जुने बॅनर तत्काळ हटविण्यात आले. त्यामुळे प्रशासनाने दखल घेतल्याचे चित्र दिसून आले होते. मात्र, नेरळ जकात नाका परिसरातील बॅनर अद्यापही जैसे थे असल्याने प्रशासनाच्या कार्यवाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
निवडणूक काळात सर्व उमेदवारांना समान संधी मिळावी, कोणताही अप्रत्यक्ष प्रचार होऊ नये, यासाठी आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी अपेक्षित असते. मात्र, काही ठिकाणी नियमांना बगल देत पदाचा गैरवापर करून बॅनर लावले जात असल्याने सामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
नेरळकर नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असून, नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. प्रशासन आता या प्रकरणाची दखल घेऊन जकात नाका परिसरातील बॅनर हटवते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके