
अमरावती, 17 जानेवारी (हिं.स.) | शुक्रवारी सायंकाळी महानगरपालिका निवडणुकीचे निकाल स्पष्ट होताच शहरातील सत्तासमीकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. ८७ सदस्यांच्या सभागृहात सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेला ४४ हा जादुई आकडा गाठणे भाजपसाठी अवघड ठरणार असल्याचे चित्र आहे. सर्वाधिक २५ जागा जिंकून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी सत्तेची चावी मात्र आमदार रवी राणा यांच्या ‘युवा स्वाभिमान’ पक्षाकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस ‘किंगमेकर’ ठरेल, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, प्रत्यक्ष निकालात राष्ट्रवादीला केवळ ११ जागांवर समाधान मानावे लागल्याने त्यांची सौदेबाजीची ताकद सध्या तरी कमी झाली आहे. याउलट, रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने १५ जागा जिंकत भाजपसमोर तगडे राजकीय आव्हान उभे केले आहे. या निकालामुळे सत्तास्थापनेचे सर्व गणित युवा स्वाभिमानभोवती फिरू लागले आहे.
भाजपला बहुमतासाठी युवा स्वाभिमानच्या १५ आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या ३ नगरसेवकांची साथ अनिवार्य ठरणार आहे. या संभाव्य युतीचा आकडा ४३ वर येत असल्याने भाजपला आणखी एका नगरसेवकाचा पाठिंबा शोधावा लागणार आहे. त्यामुळे भाजप कोणाला सोबत घेते आणि कोणत्या अटींवर सत्ता स्थापन करते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पदांसाठी मोठ्या प्रमाणात ‘बार्गेनिंग’ रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रवी राणा हे याआधीही भाजपसोबत राहिले असले, तरी आता त्यांच्या पक्षाकडे असलेल्या १५ जागांमुळे त्यांची सौदेबाजीची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे. केवळ बाहेरून पाठिंबा देण्यापेक्षा मनपाच्या सत्तेत निर्णायक सहभाग मिळवण्यावर त्यांचा भर राहणार असल्याचे संकेत आहेत. विशेषतः स्थायी समिती सभापतीपद किंवा उपमहापौरपदासाठी युवा स्वाभिमानकडून ठाम दावा केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे.
दुसरीकडे, काँग्रेसने १५ आणि एमआयएमने १२ जागा जिंकत चांगली कामगिरी केली असली, तरी सत्तास्थापनेच्या समीकरणापासून हे दोन्ही पक्ष सध्या दूर असल्याचे दिसते. राष्ट्रवादीची ताकद घटल्याने भाजपविरोधी आघाडी उभी राहण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे भाजपची सत्ता येण्याची चिन्हे असली, तरी मनपाच्या सत्तेचा सुकाणू नेमका कोणाच्या हातात असेल, याचा अंतिम निर्णय रवी राणा यांच्या अटी व भूमिकेवरच अवलंबून राहणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी