
इस्लामाबाद, 18 जानेवारी (हिं.स.)।पाकिस्तानच्या कराची शहरात एका शॉपिंग मॉलला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. माहितीनुसार, कराचीतील एम. ए. जिन्ना रोडवरील गुल प्लाझा या शॉपिंग मॉलमध्ये शनिवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या आगीत किमान तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, कराचीच्या सिव्हिल रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरचे कार्यकारी संचालक डॉ. साबिर मेमन यांनी सांगितले की तीन मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले होते. हे तिघेही रुग्णालयात आणताना मृत अवस्थेत होते, असे त्यांनी स्पष्ट केले. अहवालानुसार, दक्षिण विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) सैयद असद रजा यांनी सांगितले की या घटनेत किमान सात जण जखमी झाले आहेत.
बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की उंच व्यावसायिक इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या दुकानांमध्ये आग लागली असून, वरच्या मजल्यांवर अनेक लोक अडकले असल्याची माहिती आहे. बचाव पथकाचे प्रवक्ते हसनुल हसीब खान यांनी सांगितले की सहा जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांनी पुढे सांगितले की आग विझवण्यासाठी अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत. परिस्थिती अद्याप गंभीर असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
गार्डन उपविभागीय पोलीस अधिकारी मोहसिन रजा यांनी सांगितले की प्राथमिक तपासात एका दुकानात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे निष्पन्न झाले आहे.ही आग नंतर संपूर्ण शॉपिंग मॉलमध्ये पसरली.त्यांनी सांगितले की अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या असून सिव्हिल रुग्णालयातील अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.
सिंध प्रांताचे राज्यपाल कामरान टेसोरी यांनी या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या निवेदनात संबंधित अधिकाऱ्यांना बचाव व मदत कार्य तातडीने वेगाने राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, या घटनेबाबत आणि आग विझवण्याच्या प्रयत्नांवर सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देत, व्यापारी आणि बाधित नागरिकांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode