
जकार्ता , 18 जानेवारी (हिं.स.)।इंडोनेशियाच्या पूर्व भागात रविवारी बचाव पथकाला त्या टर्बोप्रॉप विमानाचे अवशेष सापडले, जे शनिवारी बेपत्ता झाले होते. या विमानात असलेल्या ११ जणांचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. इंडोनेशियाच्या हवाई वाहतूक विभागाचे हे विमान योग्याकार्ता येथून दक्षिण सुलावेसीची राजधानी मकासरकडे जात होते.शनिवारी दुपारी विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला होता. स्थानिक वेळेनुसार दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास संपर्क पूर्णपणे खंडित झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी शोध मोहीम सुरू केली.
मकासर शोध आणि बचाव संस्थेचे प्रमुख मुहम्मद आरिफ अन्वर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की बचाव पथकाला विमानाचे काही भाग सापडले आहेत. यामध्ये फ्युजलेज, टेल सेक्शन आणि खिडक्या यांचा समावेश आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, बेपत्ता प्रवासी आणि चालक दलाच्या शोधासाठी पथके सातत्याने काम करत आहेत. आरिफ म्हणाले, “सध्या आमचे सर्वोच्च प्राधान्य पीडितांचा शोध घेणे आहे आणि काही लोक अजूनही जिवंत असण्याची आशा आम्हाला आहे.” शोध मोहिमेसाठी हवाई बचाव पथकही तैनात करण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हे विमान मकासर शहराजवळील बंटिमुरुंग–बुलुसाराउंग नॅशनल पार्कमधील माउंट बुलुसाराउंग या डोंगरावर आदळले असावे. या भागाची गुंतागुंतीची भौगोलिक रचना आणि कमी दृश्यमानता यामुळे बचाव कार्य अधिक कठीण झाले आहे. स्थानिक लष्करी कमांडर बंगुन नवाको यांनी सांगितले की खडतर भूभाग आणि दाट धुके ही बचाव मोहिमेसमोरील मोठी आव्हाने आहेत. “या परिस्थितीमुळे जमिनीवरील हालचाल मंदावते आणि हवेतून निरीक्षण करणेही कठीण होते,” असे त्यांनी सांगितले.
या शोध आणि बचाव मोहिमेत हवाई दल, पोलीस, शोध-बचाव संस्था आणि स्थानिक स्वयंसेवकांसह १,००० हून अधिक लोक सहभागी आहेत. विमानाच्या शेवटच्या ठिकाणाजवळील मारोस रीजेंसीमध्ये हेलिकॉप्टर, ड्रोन आणि जमिनीवरील पथके तैनात करण्यात आली आहेत. विविध यंत्रणा एकत्र येऊन दुर्गम भागांचा शोध घेत आहेत.
या विमानात एकूण ११ जण होते, ज्यामध्ये सात चालक दलाचे सदस्य आणि सागरी व्यवहार व मत्स्यपालन मंत्रालयाचे तीन सरकारी अधिकारी होते. मंत्री शक्ति वाह्यू त्रेंगोनो यांनी सांगितले की हे अधिकारी सरकारी कामासाठी प्रवास करत होते. “ते या भागातील संसाधनांची हवाई पाहणी करण्याच्या मोहिमेवर होते,” असे त्यांनी स्पष्ट केले.
विमान उत्पादक कंपनी एटीआरने निवेदन जारी करून सांगितले की त्यांच्या एका विमानाशी संबंधित अपघाताची माहिती त्यांना मिळाली असून, ते बचाव आणि तपास कार्यात सहकार्य करत आहेत. कंपनीने म्हटले आहे की एटीआरचे तज्ज्ञ इंडोनेशियन अधिकारी आणि ऑपरेटरकडून सुरू असलेल्या तपासात पूर्ण सहकार्य करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode