मुंबई महापालिकेसाठी सत्तासंघर्षाची चर्चा; हॉटेल पॉलिटिक्समागील कारण स्पष्ट
मुंबई, 18 जानेवारी (हिं.स.)। राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेत भाजप-शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी हे बहुमत अत्यंत काठावरचं असल्याने पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. घोडेबाजार, नगरसेवकांची पळवापळव आणि सत्तास्थापन
Sheetal Mhatre


मुंबई, 18 जानेवारी (हिं.स.)। राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेत भाजप-शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी हे बहुमत अत्यंत काठावरचं असल्याने पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. घोडेबाजार, नगरसेवकांची पळवापळव आणि सत्तास्थापनेसाठी दबावतंत्र वापरलं जात असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यातच शिंदे गटाच्या शिवसेनेनं आपल्या 29 नगरसेवकांना मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या शिवसेनेच्या महिला प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी हॉटेल पॉलिटिक्समागील कारण स्पष्ट केलं आहे. आम्ही महायुती म्हणून लढलो आणि जिंकलो असून पाठीत खंजीर खुपसण्याची आमची भूमिका नाही. महायुती म्हणूनच सत्तेत येणार, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्यामागे कोणताही राजकीय डाव नसून, जवळपास 20 नगरसेवक नवखे असल्याने त्यांना मनपाचं कामकाज समजावून सांगण्यासाठी दोन दिवसांचं प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं आहे, असं त्यांनी सांगितलं. हे नगरसेवक उबाठा गटाच्या उमेदवारांना हरवून निवडून आले आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

महायुती ही बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेली नैसर्गिक युती असून बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा हा प्रकार नाही, असंही शीतल म्हात्रे यांनी ठामपणे सांगितलं. महापौर पदाचा निर्णय महायुतीचे वरिष्ठ नेते घेतील, असंही त्यांनी नमूद केलं.

दरम्यान, भाजपचे 89 नगरसेवक निवडून आल्याने 114 हा मॅजिक फिगर गाठण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याची गरज असल्याचं स्पष्ट झालं आहे. ही गरज लक्षात घेऊन शिंदे गटाकडून महापौरपदाची अडीच-अडीच वर्षांची समान वाटणी भाजपसोबत करण्याचा प्रस्ताव ठेवला जाऊ शकतो, तसेच स्थायी समिती आणि इतर महत्त्वाच्या समित्यांमध्ये शिवसेनेला योग्य प्रतिनिधित्व देण्याची मागणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बीएमसीतील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या हालचालींमुळे मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हं दिसत आहेत.

याचदरम्यान, संजय राऊत नाश्त्याला हॉटेल ताज लँड्स एन्डमध्ये जाणार असल्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना शीतल म्हात्रे यांनी त्यांच्यावर बोचरी टीका केली. संजय राऊत म्हणजे चाकरी सिल्व्हर ओकची आणि भाकरी मातोश्रीची, सगळ्यांना खड्ड्यात घातलं असून त्यांची खासदारकी संपत आली आहे. तीही शिंदेंच्या कृपेमुळे मिळाली होती, असा आरोप त्यांनी केला. नगरसेवकांना मस्का मारायला येणार असतील की मला शिंदेंकडे घेऊन चला, असा टोलाही त्यांनी लगावला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande