भारत आयातदाराकडून निर्यातदाराकडे वाटचाल करतोय- राजनाथ सिंह
नागपुरात मीडियम कॅलिबर दारुगोळा निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन नागपूर, 18 जानेवारी (हिं.स.) : देशाला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी महाराष्ट्रातील नागपूर येथे सोलर
नागपुर मे आयोजित कार्यक्रम मे राजनाथ सिंह का सत्कार करते हुए सत्यनारायण नुवाल, साथ मे महाराष्ट्र के मंत्री चंद्रशेखर बावनकुले


नागपुरात मीडियम कॅलिबर दारुगोळा निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन

नागपूर, 18 जानेवारी (हिं.स.) : देशाला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी महाराष्ट्रातील नागपूर येथे सोलर इंडस्ट्रीजद्वारे उभारण्यात आलेल्या मीडियम कॅलिबर दारुगोळा निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की भारत आता लष्करी उपकरणांचा आयातदार न राहता निर्यातदार देश म्हणून वेगाने पुढे जात आहे. या कार्यक्रमाला सोलर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

याप्रसंगी संरक्षण मंत्री म्हणाले की, संरक्षण क्षेत्रात खासगी कंपन्यांची भूमिका दिवसेंदिवस अधिक मजबूत होत असून आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला सोलर इंडस्ट्रीजसारख्या कंपन्या महत्त्वाचे योगदान देत आहेत. अशा आधुनिक संरक्षण प्रकल्पांकडे पाहताना केवळ एक कारखाना दिसत नाही, तर नव्या संकल्पांची, नव्या ऊर्जेची आणि नवोन्मेषाची झलक दिसते, असेही त्यांनी नमूद केले.एक काळ असा होता, जेव्हा संरक्षण उत्पादन प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रापुरते मर्यादित होते. मात्र गेल्या काही वर्षांत या विचारसरणीत बदल झाला आहे. आज खासगी क्षेत्र संरक्षण उत्पादनात मोठी भूमिका बजावत असून त्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होत आहे. यामुळे भारतीय सशस्त्र दलांना वेळेवर आणि उच्च दर्जाचा दारुगोळा उपलब्ध होणार असल्याचे संरक्षण मंत्र्यांनी सांगितले.

युद्धाचे स्वरूप बदलत असून त्याचा परिणाम सामान्य नागरिकांवरही होत असल्याचे संरक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या नवकल्पनांच्या माध्यमातून संरक्षण उद्योग अधिक सक्षम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. भारत संरक्षण उत्पादनांच्या क्षेत्रात जागतिक नेतृत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

नागपूर शहर वेगाने संरक्षण उद्योगाचे केंद्र म्हणून उदयास येत असल्याचे त्यांनी सांगितले. येथे नव्या संरक्षण उद्योगांची स्थापना होत असून, आधीपासून असलेले उद्योगही आपल्या विस्तारावर भर देत आहेत.

यावेळी बोलताना सत्यनारायण नुवाल यांनी सांगितले की ‘नागास्त्र’सारख्या स्वदेशी शस्त्रनिर्मितीचा यशस्वी वापर देशाच्या संरक्षण क्षमतेचे प्रतीक आहे. राष्ट्ररक्षण आणि देशहित लक्षात घेऊन आत्मनिर्भर भारताच्या ध्येयासाठी सोलर इंडस्ट्रीज सातत्याने कार्यरत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande