‘ऍडव्हान्टेज विदर्भ 2026 – खासदार औद्योगिक महोत्सव’ 6 ते 8 फेब्रुवारीला नागपुरात
नागपूर, 18 जानेवारी (हिं.स.)। असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी) यांच्या वतीने ‘ऍडव्हान्टेज विदर्भ 2026 – खासदार औद्योगिक महोत्सव’ची तिसरी आवृत्ती 6, 7 व 8 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसर, अंबाझरी–अमर
Advantage Vidarbha MP Industrial Festival


नागपूर, 18 जानेवारी (हिं.स.)। असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी) यांच्या वतीने ‘ऍडव्हान्टेज विदर्भ 2026 – खासदार औद्योगिक महोत्सव’ची तिसरी आवृत्ती 6, 7 व 8 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसर, अंबाझरी–अमरावती रोड, नागपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या भव्य महोत्सवाचा उद्देश विदर्भाला भारताच्या औद्योगिक नकाशावर एक सशक्त व उदयोन्मुख विकास केंद्र म्हणून स्थापित करणे हा असून यंदाच्या महोत्सवाची संकल्पना “एम्पावरिंग ग्रोथ” अशी आहे.

पत्रकार परिषदेला केंद्रीय मंत्री व खासदार औद्योगिक महोत्सवाचे प्रवर्तक नितीन गडकरी यांनी संबोधित केले. यावेळी आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री, एआयडीचे अध्यक्ष आशिष काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी ‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ 2026’च्या टीझरचे लोकार्पण करण्यात आले. या महोत्सवाला महाराष्ट्र शासन, एमएसएमई मंत्रालय व जिल्हा उद्योग केंद्र यांचे सहकार्य लाभले असून लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर, नागपूर हे प्रमुख प्रायोजक आहेत. नागपूर विद्यापीठ, आयआयएम नागपूर तसेच विविध औद्योगिक व व्यावसायिक संघटना नॉलेज पार्टनर्स आहेत.

या महोत्सवाअंतर्गत 350 हून अधिक स्टॉल्सचे भव्य औद्योगिक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. यामध्ये 100 एमएसएमई स्टॉल्स तसेच विदर्भातील विविध जिल्ह्यांचे 40 जिल्हास्तरीय स्टॉल्स असतील. संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम, सेबी, बीएसई, एनएसई, एमसीएक्स, एनसीडीएक्स, एएमएफआय, एमएसई, एनएसडीएल, सीडीएसएल यांच्यासह आघाडीच्या वित्तीय संस्था, सौरऊर्जा उत्पादक, वस्त्रोद्योग, प्लास्टिक, खनिज, कोळसा, विमानन, लॉजिस्टिक्स, आयटी, आरोग्य, फार्मास्युटिकल्स, संरक्षण, रिअल इस्टेट, अक्षय ऊर्जा व स्टार्टअप्स क्षेत्रातील उद्योगांचा सहभाग राहणार आहे. यासोबतच पेटंट गॅलरीदेखील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

महोत्सवात बिझनेस कॉन्क्लेव्ह व तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात येणार असून उद्योगांतील नव्या प्रवाहांवर, आव्हानांवर व संधींवर चर्चा होणार आहे. 25 हून अधिक सत्रांमध्ये 225 तज्ज्ञ वक्ते आणि सुमारे 5,500 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. याशिवाय जागतिक गुंतवणूकदारांसोबत 20 पेक्षा अधिक द्विपक्षीय व्यापार बैठका होणार असून B2B व B2G सहकार्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. हायड्रोजन इकोसिस्टम, मायनर मिनरल पॉलिसी, स्टार्टअप्स, संरक्षण उत्पादन आणि विकसित भारतासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांसारख्या विषयांवर विशेष गोलमेज चर्चा आयोजित करण्यात येणार आहेत.

उद्घाटन सत्राला अडानी समूहाचे संचालक (एअरपोर्ट्स) जीत अडानी, महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी संचालक व सीईओ (ऑटो व फार्मा) राजेश जेजुरीकर, तसेच सॅफरॉनस्टेजचे संस्थापक देवेन परुळेकर उपस्थित राहणार आहेत. दुग्ध व संलग्न क्षेत्रावरील चर्चासत्रात पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन. (आयएएस), इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जे. बी. प्रजापती यांच्यासह विविध मान्यवर सहभागी होणार आहेत. प्रसिद्ध बिझनेस मेंटॉर सुरेश मानशरमानी प्रेरणादायी वक्ता म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.यंदा प्रथमच ‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ’मध्ये मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय सहभाग पाहायला मिळणार असून रशिया, चीन, ब्राझील, इजिप्त, उरुग्वे, नायजेरिया, झांबिया, व्हेनेझुएला, टोगो, गयाना, बेनिन आदी सुमारे 20 देशांतील अँबॅसेडर व व्यापार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande