
तेहरान, 18 जानेवारी (हिं.स.)।इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह अली खामेनेई यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना “गुन्हेगार” ठरवले असून, हजारो आंदोलकांच्या मृत्यूला जबाबदार धरले आहे. ट्रम्प यांनी या आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्या लोकांना पाठिंबा दिला होता.
सरकारी दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या भाषणात खामेनेई यांनी सांगितले की या आंदोलनांमध्ये “काही हजार” लोकांचा मृत्यू झाला आहे. २८ डिसेंबरपासून सुरू झालेल्या आणि हिंसक पद्धतीने दडपण्यात आलेल्या आंदोलनांमध्ये किती जण मरण पावले, याबाबत कोणत्याही इराणी नेत्याने प्रथमच अधिकृत आकडा मांडला आहे. खामेनेई म्हणाले की या बंडाच्या काळात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी वैयक्तिकरीत्या निवेदने दिली.त्यांनी आरोप केला की ट्रम्प यांनी संतप्त लोकांना पुढे जाण्यास प्रोत्साहन दिले आणि म्हटले, “आम्ही तुमचा पाठिंबा करतो, आम्ही तुम्हाला लष्करी मदतही देतो.”
खामेनेई यांनी पुन्हा स्पष्ट केले की अमेरिका इराणच्या आर्थिक आणि राजकीय संसाधनांवर वर्चस्व मिळवू पाहत आहे. इराणमधील सर्व सरकारी निर्णयांवर अंतिम अधिकार खामेनेई यांचाच असतो. खामेनेई म्हणाले, मृत्यू, नुकसान आणि ईराणी जनतेविरोधातील आरोपांमुळे आम्ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना गुन्हेगार मानतो. त्यांनी आंदोलकांना अमेरिकेचे एजंट असल्याचा आरोप केला आणि सांगितले की त्यांनी मशिदी आणि शैक्षणिक संस्थांची तोडफोड केली. लोकांचे नुकसान करून त्यांनी हजारो लोकांची हत्या केली, असेही ते म्हणाले.
दरम्यान, ट्रम्प यांनी एका मुलाखतीत खामेनेई यांच्यावर तीव्र टीका केली. ते म्हणाले, “हा माणूस आजारी आहे. त्याने आपला देश नीट चालवायला हवा आणि लोकांची हत्या थांबवायला हवी. नेतृत्व खराब असल्यामुळे इराण हे जगातील राहण्यासाठी सर्वात वाईट ठिकाण आहे.” ट्रम्प यांनी पुढे म्हटले की, “ इराणमध्ये आता नव्या नेतृत्वाचा विचार करण्याची वेळ आली आहे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode