
बीड, 19 जानेवारी (हिं.स.)। अंबाजोगाई नगर पालिकेच्या निवडणुकीत यावेळेस एक अत्यंत दुर्मिळ आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरणारा योगायोग जुळून आला आहे. नगर पालिकेच्या सभागृहात आता पती-पत्नीच्या दोन जोड्या लोकप्रतिनिधी म्हणून एकत्र काम करताना दिसणार आहेत.
प्रभाग ९ मधून लोकविकास महाआघाडीच्या उमेदवार दिपाताई लोमटे यांनी विजय मिळवून प्रथमच नगरसेविका म्हणून पालिकेत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे त्यांचे पती आणि अनुभवी राजकारणी बबनराव लोमटे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाली आहे. बबनराव लोमटे यांनी प्रभाग ८ मधून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना अल्प मतांनी पराभवाचा सामना करावा लागला. यापूर्वी त्यांनी सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून काम केले असून उपनगराध्यक्ष पदही भूषवले आहे.
असाच काहीसा प्रकार दुसऱ्या एका जोडीबाबतही पाहायला मिळत आहे. प्रभाग ८ मधून शहर परिवर्तन जनविकास आघाडीच्या शिल्पा गंभिरे या दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. त्यांच्यासोबतच त्यांचे पती संजय गंभिरे यांची देखील स्वीकृत नगरसेवक पदी निवड करण्यात आली आहे. संजय गंभिरे यांनी निवडणुकीत आघाडीच्या विजयासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. एकाच सभागृहात पती आणि पत्नी अशा दोन जोड्यांना शहराची सेवा करण्याची संधी मिळणे हा लोकशाहीतील एक आगळावेगळा योगायोग मानला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis