
परभणी, 19 जानेवारी (हिं.स.)।
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिक्षक सेलचे राज्याध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के यांनी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने घेतलेल्या विसंगत भूमिकेमुळे राज्याध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्याकडे सोमवारी(दि. १९)दिला आहे.
प्रा. सोनटक्के हे मागील २१ वर्षापासून पक्षात कार्यरत असून यापूर्वी त्यांनी शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्ष, शिक्षक सेलचे प्रदेश सरचिटणीस, शिक्षक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अशा विविध पदांवर पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडली आहे. महापालिका निवडणुकीत पक्षाने घेतलेली भूमिका ही पक्षाच्या विचारधारेची विसंगत असून त्याचा परिणाम निवडणूक निकालातून पुढे आला आहे. पक्षाच्या विचारधारेच्या सर्व लोकांनी पक्षाची भूमिका नाकारली आहे. मागील अनेक महिन्यांपासून सर्व घडामोडींमुळे अस्वस्थ असल्याचे तसेच लोकांमध्ये फिरत असताना लोकांच्या मनात निर्माण झालेला संभ्रम विचारात पाडणारा आहे. दिवसेंदिवस पक्षाची होत असलेली बदनामी आणि राजकीय पडझड ही मनाला प्रचंड वेदना देणारी आहे, असे या राजीनामापत्रात प्रा. सोनटक्के यांनी नमूद केले आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षाने विचारधारेचे विसंगत भूमिका घेतली आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील आपल्या पक्षाचे सर्व प्रतिनिधी पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज आहेत. यापुढील पक्षाची भूमिका स्पष्ट झालेली असल्यामुळे अशा परिस्थितीत इथेच थांबण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे कुठलाही संभ्रम अथवा गैरसमज निर्माण होऊ नये, यासाठी पक्षाच्या शिक्षक सेलच्या राज्याध्यक्षपदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रा. किरण सोनटक्के यांनी प्रदेशाध्यक्षांकडे सोपविला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis