
ठाणे, 19 जानेवारी (हिं.स.)। मुंबईतील महापौरपदावरून राजकीय कलगीतुरा रंगलेला असतानाच आता ठाण्यातही सत्तावाटपाचा पेच निर्माण झाला आहे. ठाणे महानगरपालिकेत भाजपला किमान दोन वर्षांसाठी महापौरपद मिळाले पाहिजे, अन्यथा आम्ही सत्तेत न राहता थेट विरोधी बाकावर बसू, असा खळबळजनक इशारा भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी दिला आहे. मुंबईतील राजकीय दबावतंत्राला उत्तर म्हणून डावखरेंनी ठाण्यात हा मोठा डाव टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
ठाण्यातील राजकीय समीकरणांवर भाष्य करताना डावखरे म्हणाले की, शीळ ते वडवली या पट्ट्यात भाजपने अत्यंत प्रभावी काम केले असून ज्या जागा वाट्याला आल्या तिथे पक्षाने शंभर टक्के यश मिळवले आहे. पक्षाची ताकद वाढली असून कार्यकर्त्यांची इच्छा आहे की ठाण्याचा महापौर भाजपचाच असावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या ठाणे महापालिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) बहुमतात आहे. मात्र सत्ता टिकवण्यासाठी भाजपची साथ महत्त्वाची आहे. बहुमत त्यांच्या हातात असले तरी आमचा सन्मान झाला पाहिजे आणि दोन वर्षांसाठी महापौरपद हा आमचा हक्क आहे, असे सांगत डावखरेंनी थेट विरोधात बसण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे ठाण्यातील सत्ताधारी युतीत तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबईत भाजपचा महापौर बसवण्यासाठी हालचाली सुरू असतानाच ठाण्यातही भाजपने आपला दावा ठोकून मुख्यमंत्री शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. आता शिंदे सेना यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule