
छत्रपती संभाजीनगर, 19 जानेवारी (हिं.स.) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) देवगिरी प्रदेशाच्या वर्ष २०२५-२६ साठी झालेल्या निवडणुकीत प्रा. डॉ. सुरेश माधवराव मुंढे यांची देवगिरी प्रदेश अध्यक्षपदी, तर डॉ. वरुणराज राजेंद्र नन्नवरे यांची प्रदेश मंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. अभाविपच्या प्रदेश कार्यालयातून निर्वाचन अधिकारी प्रा. डॉ. राहुल कुलकर्णी यांनी नूतन पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा केली. दोघांचाही कार्यकाळ एक वर्षाचा असून, दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी हिंगोली येथे होणाऱ्या ६० व्या हीरक महोत्सवी देवगिरी प्रदेश अधिवेशनात ते आपली जबाबदारी स्वीकारणार आहेत.
नूतन प्रदेश अध्यक्ष प्रा. डॉ. सुरेश माधवराव मुंढे हे मूळ गंगाखेड (जि. परभणी) येथील असून, त्यांनी हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी, नेट, एम.फिल. तसेच विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्राप्त केली आहे. ते २००७ पासून संत सावता माळी महाविद्यालय, फुलंब्री (छत्रपती संभाजीनगर) येथे हिंदी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. रशिया व मॉस्को येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात सहभाग घेऊन त्यांनी विदेश यात्रा केली असून, तीन राष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला आहे. त्यांच्या हिंदी साहित्यातील १८ पुस्तके प्रकाशित असून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत ५५ शोध निबंध प्रसिद्ध झाले आहेत. मराठवाड्यातील विद्यार्थी चळवळ मजबूत करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. २००१ पासून अभाविपच्या कार्यात सक्रिय असलेल्या प्रा. डॉ. मुंढे यांनी यापूर्वी महानगर अध्यक्ष, जिल्हा प्रमुख, विभाग प्रमुख, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तसेच राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अशी विविध पदे भूषवली आहेत. सध्या त्यांचा निवास छत्रपती संभाजीनगर येथे आहे.
नूतन प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज राजेंद्र नन्नवरे हे मूळ जळगाव येथील असून, २०१८ पासून अभाविपच्या कार्यात सक्रिय आहेत. सध्या ते डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे एम.बी.बी.एस. प्रशिक्षण पूर्ण करत आहेत. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील वसतिगृह शुल्कवाढ, परीक्षा व मूल्यमापनातील अनियमितता याविरोधातील आंदोलनांसह पश्चिम बंगालमधील संदेशखाली व आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीवरील अत्याचाराविरोधातील आंदोलनात त्यांनी प्रभावी नेतृत्व केले आहे. तसेच महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील बदलांविरोधातील आंदोलनातही त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २०२३-२४ व २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांतील विद्यार्थी परिषद निवडणुकांमध्ये अभाविपच्या विजयात त्यांचा सक्रिय सहभाग होता. देवगिरी प्रदेशातील ग्रामीण, जनजाती व शहरी सेवावस्त्यांमध्ये आरोग्य तपासणी शिबिरांच्या माध्यमातून वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये समाजभान निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले आहे. भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (ICMR), दिल्ली अंतर्गत ‘ग्रामीण भागातील महिलांमध्ये लोहमात्रा कमतरता व अॅनिमिया’ या विषयावरील संशोधन प्रकल्प त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. यापूर्वी त्यांनी मेडीव्हिजन महानगर सहसंयोजक, देवगिरी प्रदेश सहसंयोजक, राष्ट्रीय समिती सदस्य व प्रदेश सहमंत्री अशी पदे भूषवली असून, सध्या त्यांचा निवास जळगाव येथे आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis