
बीड, 19 जानेवारी (हिं.स.)। केज विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी आपल्या राजकीय प्रवासातील तिसरे स्टेशन गाठले आहे. संगीता ठोंबरे यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. २०१४ मध्ये भाजपच्या लाटेवर स्वार होऊन आमदारकी भूषवणाऱ्या ठोंबरे यांनी २०१९ मध्ये उमेदवारी हुकल्यापासून सुरू केलेला 'पक्षांतराचा' प्रवास आता शिवसेनेच्या दारात येऊन थांबला आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ठोंबरे यांनी ही राजकीय खेळी खेळल्याची चर्चा आता जिल्ह्यात रंगू लागली आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकांत भाजपने त्यांचा पत्ता कापला. त्यानंतर २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्या माध्यमातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत उमेदवारीसाठी असफल प्रयत्न केला. मात्र निवडणुकानंतर राष्ट्रवादी पक्षात त्या कधी सक्रिय दिसल्या नाहीत. परंतु आता राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी सत्तेशिवाय राहणे त्यांना काहीसे जड जात असल्याचे दिसून येत आहे. महायुतीमध्ये केज विधानसभा मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात असून तेथे नमिता मुंदडा आमदार आहेत. भाजप आणि शिवसेना यांची युती असल्याने ठोंबरे यांना येत्या काळात विधानसभा लढवण्याची संधी मिळणे जवळजवळ अशक्य आहे. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे नगारे वाजू लागले आहेत. त्यामुळे त्यांनी आता पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोठी जबाबदारी मिळविण्याच्या उद्देशाने सत्तेत असलेल्या शिवसेना शिंदे गटाची वाट धरली असल्याचे बोलले जात आहे. त्यासोबतच, शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ठोंबरे यांच्या केज येथील सूतगिरणीचा पुढील मार्ग सुकर होणार असल्याचीही चर्चा आहे.
दरम्यान, यावेळी मंत्री संजय शिरसाट यांनी प्रथमच बीड जिल्ह्यातील माजी आमदार शिवसेनेशी जोडले गेल्याचे सांगत ठोंबरे यांच्या निवडीचे स्वागत केले. संगीता ठोंबरे यांच्यासोबत सरपंच किशोर थोरात, भगवान सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय बापू केंद्रे, अशोक सक्राते, अरविंद चाळक, उमेश चाळक यांच्यासह केज मतदारसंघातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या सोहळ्याला शिवसेना बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळुक, अनिल जगताप, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, धाराशिवचे शिवसेना नेते अजित पिंगळे यांच्यासह पक्षाचे इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis