
छत्रपती संभाजीनगर, 19 जानेवारी (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका निवडणुकीत चार जागांवर विजय मिळविल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या निवडणुकांसाठी पक्षाने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांत ५७इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने ६२ उमेदवार उभे केले होते. पाच अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिला होता. एकूण चार जागांवर पक्षाला विजय मिळाला आहे. या यशामुळे पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नियोजनबद्धरित्या उतरण्याचा निर्णय घेत आगामी जि. प.आणि पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मागील दोन दिवसांपासून इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होती. काही इच्छुकांच्या मुलाखती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात घेण्यात आल्या आहेत. पक्षाच्या जिल्हा प्रभारी अरुंधती शिरसाट यांनी दोन दिवस मुलाखती घेतल्या. जिल्हा परिषदेसाठी २२ इच्छुकांच्या आणि पंचायत समितीसाठी ३५ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या आहेत. या वेळी जिल्हा निरीक्षक योगेश बन, जिल्हाध्यक्ष रामेश्वर तायडे, जिल्हाध्यक्ष रूपचंद गाडेकर, शहराध्यक्ष पंकज बनसोडे, महिला जिल्हाध्यक्ष कोमल हिवाळे, साधना पठारे, भाऊराव गवई उपस्थित होते. दरम्यान, संबंधित इच्छुक उमेदवाराचा गट किंवा गणाची राजकीय सद्यस्थिती आणि उमेदवाराची निवडणूक लढविण्याची पूर्वतयारी जाणून घेऊन उमेदवारी दिली जाणार आहे. त्यामुळे बहुतांश उमेदवार तयारीने मुलाखतीला आले होते. वंचित बहुजन आघाडीने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी दोन दिवसांत ५७ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis