
नांदेड, 02 जानेवारी (हिं.स.)। ५ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ नांदेडला येणार आहेत, अशी माहिती खा. अशोकराव चव्हाण यांनी यावेळी बोलताना दिली. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी नांदेड येथे येत आहेत.
नांदेड शहरात चांगले काम होत आहे, मी जे बोलतो ते करून दाखवितो, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी उठसुठ टीका करणाऱ्या विरोधकांवर 'प्रहार' केला. खा. चव्हाण यांनी मागील काळात केलेल्या विकासकामांवर विस्तृत भाष्य केले. नांदेडला विमानसेवा सुरू होताना विरोध करणारे आज बॅग घेवून पुण्याला जात आहेत, असे म्हणत त्यांनी विरोधकांना चिमटा काढला. मी जे चांगले झाले ते दाखविण्याचा प्रयत्न केला असून जे आश्वासन देतो ते मी पाळतो, मी कधी मतदारांना फसविले नाही. विकासाची भूक कोण भागवू शकतो, हे ओळखून मतदारांनी त्यांच्या पाठीशी उभे राहावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis