
बीड, 2 जानेवारी, (हिं.स.)। धारूर येथील जिल्हा परिषद शाळा व गटशिक्षणाधिकारी कार्यालय यांच्य संयुक्त विद्यमाने ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले. शाळांमधील बालवैज्ञानिकांनी यात सहभागी होत ४० विविध प्रकारचे सादरीकरण केले.
प्रदर्शनात प्राथमिक गटातील २५ आणि माध्यमिक गटातील १५ शाळांचा सहभाग होता. पर्यावरण संरक्षण, जलसंधारण, नवीकरणीय ऊर्जा, आरोग्य, शेतीपूरक तंत्रज्ञान आणि विज्ञान व दैनंदिन जीवन यावर आधारित प्रयोग विशेष आकर्षण ठरले. या स्पर्धेत चार शिक्षकांनीही सहभाग घेतला. त्यांनी स्वतःचे विज्ञान प्रयोग सादर केले. शिक्षकांचे प्रयोग विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले.
शिक्षक गटात प्राथमिक स्तरावर जिल्हा परिषद आंबेवडगाव येथील कल्पना साखरकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. माध्यमिक गटात नूतन विद्यालय अंजनडोह येथील प्रतिभा राऊत यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विद्यार्थी गटात प्राथमिक विभागात जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, धारूर प्रथम क्रमांकावर राहिली. यशोदीप इंग्लिश स्कूल दुसऱ्या, तर जिजामाता विद्यालय, तेलगाव तिसऱ्या क्रमांकावर राहिले. माध्यमिक गटात जीवन शिक्षण विद्यालय, गांजपूर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. जिल्हा परिषद शाळा, हिंगणी दुसऱ्या, तर नूतन विद्यालय, अंजनडोह तिसऱ्या क्रमांकावर राहिले. विजयी संघांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis